“उद्धव ठाकरेंचे दोन फोन, आदित्यचं नाव घेऊ नका”: दिशा सालियन प्रकरणात नारायण राणेंचा खळबळजनक खुलासा!

मुंबई – दिशा सालियन प्रकरणात उद्धव ठाकरे यांनी आपल्याला दोनदा फोन करून “आदित्य ठाकरेंचं नाव घेऊ नये” अशी विनंती केल्याचा धक्कादायक दावा खासदार नारायण राणे यांनी केला आहे. या प्रकरणात सहकार्य करण्याची विनंती उद्धव यांनी केली, तर आपण त्यांना “संध्याकाळी तुमची मुलं कुठे जातात, याची काळजी घ्या” असा सल्ला दिल्याचेही राणे यांनी सांगितले. या खुलाशाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
दिशा सालियन प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले असून, तिच्या वडिलांनी नव्याने याचिका दाखल केली आहे. यापूर्वी नितेश राणे यांनीही उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंना दोन कॉल केल्याचा दावा केला होता. आता नारायण राणेंनी या दोन्ही कॉलमधील संभाषणाचा तपशील उघड केला आहे.
पहिला कॉल: “आदित्यचं नाव घेऊ नका”
नारायण राणे म्हणाले, “दिशा सालियन प्रकरण घडल्यानंतर मला पहिला फोन आला. मिलिंद नार्वेकरांनी सांगितलं की उद्धव ठाकरे बोलणार आहेत. त्यांनी मला विनंती केली की, सध्या आदित्यचं नाव घेऊ नका. मी त्यांना म्हणालो, एका निरपराध मुलीची हत्या झाली आहे, आरोपींना शिक्षा झाली पाहिजे. तुम्ही तुमच्या मुलांची काळजी घ्या, ते संध्याकाळी कुठे जातात हे बघा. त्यावर ते म्हणाले, मी काळजी घेतो, पण तुम्ही सहकार्य करा.”
दुसरा कॉल: “हॉस्पिटल परवानगी आणि पुन्हा विनंती”
राणे पुढे म्हणाले, “दुसरा फोन कॉल हा कोरोनाकाळात आला. त्यावेळी आमच्या हॉस्पिटलची परवानगी राज्य सरकारकडे प्रलंबित होती. उद्धव ठाकरेंनी सांगितलं की ती मिळेल, पण पुन्हा एकदा आदित्यचं नाव घेऊ नये अशी विनंती केली. या प्रकरणात सहकार्य करा, असं ते म्हणाले.” यासोबतच राणेंनी प्रश्न उपस्थित केला की, “किशोरी पेडणेकरांनी दिशाच्या आई-वडिलांवर दडपण का आणलं?”
सचिन वाझे, कोरटकरवर कारवाई का नाही?
नारायण राणे यांनी मुंबई पोलिसांवरही निशाणा साधला. “मी एक वाक्य बोललो आणि पोलिसांनी मला अटक केली. पण सचिन वाझे आणि प्रशांत कोरटकर यांच्यावर या प्रकरणात कारवाई का होत नाही? दिशा सालियन प्रकरणात पोलिस का मागे हटले आहेत?” असा सवाल त्यांनी केला. तसेच, “शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कोरटकरला शोधून काढलं पाहिजे,” अशी मागणीही त्यांनी केली.
अनिल परबांवरही टीका –
शिवसेना (उबाठा) नेते अनिल परब यांच्यावरही राणेंनी जोरदार टीका केली. “अनिल परब आणि आक्रमकता याचा काही संबंध नाही. त्यांनी आतापर्यंत कुणाला कानफटीत तरी मारली आहे का? चित्रा वाघ यांच्या मागे मी आणि संपूर्ण भाजप आहे. परब सांगतील तिथे आम्ही जाऊ,” असा टोला राणेंनी लगावला.




