मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली. त्यांच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीमध्ये फूट पडल्याचे पाहायला मिळत आहे. या सगळ्यावरून भाजपचे खासदार नारायण राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. काय म्हणाले नारायण राणे? उद्धव ठाकरे आधी दोन्ही हातवर करून बोलत असायचे. मात्र आता ते हात एकदम छोटे झाले. त्यामुळे उद्या स्वबळावर लढून काय होणार? स्वबळाची ताकद त्यांची राहिली नाही. 46 वर्षात साहेबांनी जे मिळवलं ते अडीच वर्षात यांनी गमावलं, अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली. तसेच गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटाची भाजपशी जवळीक वाढताना दिसत आहे. याबाबत विचारले असता नारायण राणे म्हणाले की, माहित नाही, मला बरं वाटतंय, वरिष्ठ नेते याबाबत निर्णय घेतील. तो जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य राहील, असे त्यांनी म्हटले. संजय राऊतांवर टीका काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्य आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप केला होता. यावर बोलताना नारायण राणे म्हणाले संजय राऊत यांची मानसिकता चांगली नाही. ते सध्या डिप्रेशनमध्ये आहेत. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे मी लक्ष देत नाही. तुम्हीही देऊ नका असा सल्लादेखील त्यांनी दिला. शिंदेच्या नाराजीवर काय बोलले? देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नाराजीची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली होती. याबाबत विचारले असता एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या काळात खूप चांगलं काम केलं आहे. यावेळी भाजपचे आमदार जास्त निवडून आले. त्यामुळे भाजपाचा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे शिंदे कधीच नाराज होऊ शकत नाही असे नारायण राणे म्हणाले.