पवारांच्या राष्ट्रवादीचा करमाळा विधानसभेचा उमेदवार ठरला; जयंत पाटलांनी केले नाव जाहीर

सोलापूर : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. करमाळा विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार ठरला असून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोलापूरच्या बैठकीत माजी आमदार नारायण पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली. माजी आमदार नारायण पाटील हे करमाळ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असणार आहेत.
काय म्हणाले जयंत पाटील?
करमाळ्यातून माजी आमदार नारायण पाटील यांना आपल्याला निवडून आणायचे आहे, त्यामुळे त्यांच्या विजयासाठी कामाला लागा, असा आदेशच जयंत पाटील यांनी करमाळ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिला. जयंत पाटील यांनी पक्षाच्या बैठकीतच नारायण पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केल्याने नारायण पाटील यांच्या विधानसभा उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले आहे.
या बैठकीत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, जिल्हा कार्याध्यक्ष राजकुमार पाटील, करमाळा राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष संतोष वारे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.




