नरसिंहराव हे महान भूमीपुत्र-मनमोहनसिंग

जन्मशताब्दी कार्यक्रमात माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली: दिवंगत माजी पंतप्रधान नरसिंहराव हे या देशाचे महान भूमीपुत्र होते. देशातील आर्थिक सुधारणांचे तेच खरे जनक होते अशी प्रांजळ कबुली माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी दिली आहे. आर्थिक सुधारणा लागू करण्याची दूरदृष्टी व धाडस नसिंहराव यांनी दाखवले तेच भारताच्या हिताचे ठरले असेही त्यांनी म्हटले आहे. मनमोहनसिंग हे नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री होते.
त्यांच्या काळात देशात मोठ्या आर्थिक सुधारणा झाल्याने देश आर्थिकदृष्ट्या वेगळ्या उंचीवर गेला होता. तथापि या आर्थिक सुधारणांचे खरे जनक नरसिंहराव हेच होते असे मनमोहनसिंग यांनी प्रथमच स्पष्ट केले आहे. तेलंगणा प्रदेश कॉंग्रेस समितीने नरसिंहराव यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचा वर्षभराचा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्याच्या उद्घाटन प्रसंगी मनमोहनसिंग बोलत होते.
आपण 1991 साली अर्थमंत्री या नात्याने ज्या दिवशी पहिला अर्थसंकल्प सादर केला त्याच दिवशी हा कार्यक्रम होतो आहे याचा आपल्याला विशेष आनंद आहे असे मनमोहनसिंग यांनी यावेळी नमूद केले. त्यांचा त्यावेळचा अर्थसंकल्प हा
देशाच्या आर्थिक उदारीकरणाच्या प्रकियेचा पाया म्हणून ओळखला जातो. या अर्थ संकल्पाने देशाचा सारे आर्थिक चित्रच बदलले असे मनमोहनसिंग म्हणाले. त्यावेळी देशात मोठ्या आर्थिक सुधारणा हाती घेणे हे धाडसाचे काम होते पण नरसिंहराव यांच्यामुळेच ते शक्य झाले त्यांनी मला या संबंधात पुर्ण मोकळीक दिली होती.
भारताची अर्थव्यवस्था त्यावेळी पुर्ण आजारी होती व त्याचे गांभीर्य नरसिंहराव यांच्या पुर्ण लक्षात होती असेहीं मनमोहनसिंग यांनी नमूद केले. राजीव गांधी यांच्या प्रमाणेच नरसिंहराव यांना देशांतील गरीबांप्रती अत्यंत कणव होती. नरसिंहराव यांच्या पाठींब्यामुळेच भारताला जगातील
एक मोठी आर्थिक शक्ती म्हणून आकार देण्याचे काम होऊ शकले आहे असेही त्यांनी नमूद केले.
नरसिंहराव यांच्या काळात भारताचे चीन बरोबरचे संबंधही खूप सुधारले होते व सार्क देशांबरोबरही त्यांनी चांगले संबंध राखले होते. लूक ईस्ट हे त्यांचेच धोरण होते असेहीं मनमोहनसिंग यांनी निदर्शनाला आणून दिले. भारताच्या अंतरीक्ष संशोधन कार्यालाही नरसिंहराव यांनीच मोठी चालना दिली. त्यामुळेच
एएसएलव्ही व पीएसएलव्ही या यानांची यशस्वी चाचणी होऊ शकली.
1996 साली त्यांनी डॉ एपीजे अब्दुल कलाम यांना अणू चाचणीची तयारी करण्याची सुचना केली. त्यानुसार त्याची तयारी झाली. नंतर ही चाचणी वाजपेयींच्या काळात घेण्यात आल्याची आठवणही त्यांनी करून दिली. विरोधकांनाहीं विश्वासात घेऊन काम करण्याचे कौशल्य नरसिंह राव यांनी दाखवले होते असेहीं ते म्हणाले.





