पोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला जन्मठेप 

पुणे: पोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम 33 वर्षीय बापाला जन्मठेप आणि 16 हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश आर.व्ही.अदोणे यांनी सुनावली. दंडापैकी 10 हजार रुपये पीडित मुलीला देण्यात यावेत, असेही न्यायालयाने आदेशात नमुद केले आहे. ही घटना माणूसकीला काळीमा फासणारी घटना आहे. मुलीच्या रक्षणाची जबाबदारी वडिलांची आहे. तो वडिलच येथे भक्षक बनला आहे.

समाजात अशा घटना वाढल्या आहेत. त्यामुळे कायद्यामध्ये सुधारणा करून केंद्र सरकारने अशा गुन्ह्यात कमीत कमी 20 वर्षे शिक्षेची तरतुद केली आहे. यावर या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात येते. त्यामुळे या गुन्ह्यात अधिकाधिक शिक्षा देण्याचा युक्तीवाद अतिरिक्त सरकारी वकील ऍड. प्रमोद बोंबटकर यांनी केला होता.

येरवडा, लक्ष्मीनगर भागात ही घटना घडली. पीडित 12 वर्षीय मुलीचा आईने याबाबत येरवडा पोलिसात फिर्याद दिली आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी 10 साक्षीदार तपासले. त्यामध्ये पीडित, तिची आई, सामाजिक संस्थेच्या दोन महिला आणि डॉक्‍टरांची साक्ष महत्त्वाची ठरली. सन 2014 मध्ये पीडित सातवीत असताना ही घटना उघड झाली. तिच्या शाळेत सामाजिक संस्थेतर्फे “गुड टच, बॅड टच’ उपक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी वडील चौथीपासून गैरकृत्य करत असल्याचे लेखी पीडितेने दिले. हा गुन्हा उघडकीस आला. या प्रकरणात येरवडा पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले.

भारतीय दंड संहिता कलम 376 (बलात्कार), 506 (धमकाविणे) आणि बाललैंगिक अत्याचाराच्या विविध कलमानुसार शिक्षा सुनावण्यात आल्या असून, सर्व शिक्षा एकत्रित भोगायच्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.