वंदना बर्वे नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जर्मनी दौऱ्यावर जाण्यापूर्वी भाजपकडून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर केले जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. भाजपचे अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांच्या निवासस्थानी रविवारी उच्चस्तरीय बैठक संपन्न झाली. यात दहा नावांवर चर्चा झाली. राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरविण्यासाठी भाजपने 14 सदस्यीय व्यवस्थापन समिती नेमली आहे. यात केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत, जी. किशन रेड्डी, अर्जुन राम मेघवाल, महासचिव विनोद तावडे आणि सी टी रवि आदी नेत्यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जर्मनी दौऱ्यावर निघण्यापूर्वी जी-7 गटाच्या बैठकीसाठी जर्मनीला जाणार आहेत. तत्पूर्वी, उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता आहे. सध्या दहा नावांवर चर्चा केली जात असून यात कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गहलोत, छत्तीसगडच्या राज्यपाल अनुसया उके आणि झारखंडच्या राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांच्याव्यतिरिक्त मुख्तार अब्बास नकवी, आरिफ मोहम्मद खान, आंध्र प्रदेशचे राज्यपाल विश्वभूषण हरिचंदन, बिहारचे राज्यपाल फागू चौहान, हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय आणि तेलंगाणाच्या राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन यांचे नाव सामील आहे. याशिवाय, शीख समुदायातील नावाचाही विचार केला जात आहे. यात पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि उत्तराखंडचे राज्यपाल गुरमित सिंग यांच्या नावाची चर्चा आहे. महत्वाचे म्हणजे, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या माध्यमातून भाजप एका दगडात दोन पक्षी मारण्याच्या तयारीत आहे. उमेदवारी अद्याप निश्चित झाली नसली तरी एक चेहरा उत्तरेतून आणि दुसरा चेहरा हा दक्षिणेतील असेल, अशी माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली आहे. भाजप उमेदवाराची घोषणा याच आठवड्यात होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान 26 ते 28 जून असे तीन दिवस जर्मनीत असणार आहे. नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख 29 जून आहे. अशात, 25 जूनपर्यंत उमेदवाराच्या नावावर अंतिम निर्णय घेतला जाईल, असे सूत्राने सांगितले.