नाणे मावळ : कामशेत-जांभवली रस्त्याची चाळण ! दुरवस्थेमुळे स्थानिक नागरिक त्रस्त

नाणे मावळ, – नाणे मावळात जाणारा कामशेत -जांभवली रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गाने ये-जा करणाऱ्या नागरिकांना वाहने चालवताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या मार्गावर दररोज लहान मोठे अपघात घडत आहेत. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. या मार्गाची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.
कामशेत-जांभवली हा नाणे मावळातील रहदारीचा मार्ग आहे. या मार्गावर दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडत आहेत. या मार्गाचे दर्जेदार डांबरीकरण करण्यात यावे. जेणे करून प्रवाशांना व वाहनचालकांना त्रास होणार नाही. पावसाळ्यापूर्वी या रोडचे काम न झाल्यामुळे पहिल्याच पावसाच्या पाण्याने खड्डे भरून राहिल्याने तेथून ये-जा करणाऱ्या नागरिकांना प्रवासात अडथळे निर्माण होत आहेत.
नाणे मावळातील नागरिकांसाठी कामशेत ही प्रमुख बाजारपेठ असल्याने येथे खरेदीसाठी येणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे येणाऱ्या प्रवाशांना या खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे. वाहने पाण्यातून ये-जा करणाऱ्या रस्त्याच्या पायी चालणाऱ्या नागरिकांच्या अंगावर पाणी उडते. त्यातून किरकोळ वाद होतात.
पाण्यातून गाडी घेऊन जाताना दुचाकी घसरून पडण्याचे प्रकार घडत आहे. खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे असा प्रश्न निर्माण होत आहे. नाणे मावळातून हा कामशेत परिसरातील नागरिकांसाठी ये-जा करण्याचा प्रमुख मार्ग असल्याने येथे राहणारी वर्दळ मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे संबंधित प्रशासनाने हा रस्ता तात्काळ दुरुस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.





