नांदेड : चमत्कार घडेल?

नांदेड हे मराठवाड्यातील औरंगाबादनंतरचे सर्वांत मोठे शहर आहे. नांदेड जिल्हा लोकसभेच्या तीन मतदारसंघांत विभागला गेला आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघात नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, भोकर, नायगाव, मुखेड आणि देगलूर या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघात आजवर झालेल्या 19 लोकसभा निवडणुकांपैकी 15 निवडणुका कॉंग्रेसने जिंकल्या आहेत.

– विदुला देशपांडे

नांदेड लोकसभा मतदारसंघ हा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला. तेथे कॉंग्रेसच्या विरोधकांनी कितीही तगडा उमेदवार दिला तरी त्यांना काही फरक पडणार नाही, इतकी चव्हाणांना इथे विजयाची खात्री आहे. यावेळी भाजपने प्रतापराव पाटील चिखलीकर यांना उमेदवारी दिली आहे. चव्हाण यांचा बालेकिल्ला अभेद्य वाटला तरी प्रतापराव पाटील चिखलीकर यांना पक्षाची आणि कार्यकर्त्यांची योग्य साथ मिळाली तर तेही चमत्कार घडवून आणू शकतात, असेही मत व्यक्‍त होत आहे.

अपेक्षेप्रमाणे नांदेड लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेसतर्फे अशोक चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बाकीच्या ठिकाणचे माहीत नाही पण या लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसला विजयाची नक्कीच खात्री असेल. कारण 2014 च्या मोदी लाटेतही अशोक चव्हाणांनी आपला गड चांगल्या प्रकारे राखला होता. याहीवेळी त्याच विश्‍वासाने कॉंग्रेसने त्यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. मात्र यंदा चिखलीकर यांच्या रूपाने अशोक चव्हाणांना या निवडणुकीत तगडे आव्हान मिळाले असल्याचे मत राजकीय विचारवंत बोलून दाखवत आहेत.

नांदेड हे मराठवाड्यातील औरंगाबादनंतरचे सर्वात मोठे शहर आहे. नांदेड जिल्हा लोकसभेच्या तीन मतदारसंघांत विभागला गेला आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघात नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, भोकर, नायगाव, मुखेड आणि देगलूर या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघात आजवर झालेल्या 19 लोकसभा निवडणुकांपैकी 15 निवडणुका कॉंग्रेसने जिंकल्या आहेत. माजी मुख्यमंत्री आणि देशाचे माजी गृहमंत्री शंकरराव चव्हाण हे दोन वेळा याच मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. इथे एकदा शेड्यूल कास्ट फेडरेशन, एकदा जनता पक्ष, एकदा जनता दल आणि एकदा भाजप निवडून आले आहेत. तरीही अजूनही कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणावा इतकी कॉंग्रेसची पाळेमुळे येथे खोलवर रूजली आहेत.

शंकरराव चव्हाण दोन वेळा राज्याचे मुख्यमंत्री होते तर त्यांचे पुत्र अशोक चव्हाण हे एकदा मुख्यमंत्री होते. आदर्श प्रकरणात अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर जवळजवळ चार वर्षे ते राजकीय विजनवासात होते. 2014च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसने त्यांना उमेदवारी देऊन पुन्हा सक्रिय राजकारणात आणले. त्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांची नांदेडमध्ये सभा होऊनही अशोक चव्हाण निवडून आले. 2014 मध्ये मोदी लाट असतानाही जवळजवळ 82 हजार मताधिक्‍य घेऊन अशोक चव्हाण निवडून आले.

नांदेडमध्ये महानगरपालिकेपासून जिल्हा परिषदेपर्यंत सगळीकडे चव्हाणांचे म्हणजे कॉंग्रेसचे वर्चस्व आहे. त्यांना टक्‍कर देणे अजिबात सोपे नाही. त्यांचा पराभव करणे अशक्‍य वाटावा इतका कठीण आहे. ते आव्हान भाजपचे प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पेलले आहे.

नांदेडमध्ये अशोक चव्हाणांचा दबदबा असला तरी चिखलीकर यांचा जनसंपर्क आणि लोकांचा नेता ही प्रतिमा यामुळे नांदेडमधील लढत अधिक चुरशीची होणार असे भाकित सर्वच राजकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. प्रताप पाटील चिखलीकर हे लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार आहेत. आता त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे.

प्रताप पाटील चिखलीकर हे मूळचे कॉंग्रेसवासी आहेत. नंतर ते राष्ट्रवादीत आले, मग शिवसेनेत आणि आता भाजपात प्रवेश करते झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते कट्टर समर्थक आहेत. शिवसेनेत असतानाही ते फडणवीस यांचे समर्थक होते. पूर्वी लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघातून ते अपक्ष म्हणून निवडून आले होते.

स्थानिक पातळीवर त्यांचे अशोक चव्हाण यांच्याशी अजिबात पटत नाही. दोघेही एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. म्हणूनच भाजपने त्यांना अशोक चव्हाणांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. म्हणूनच अशोक चव्हाणांना ही निवडणूक जिंकणे जड जाण्याची शक्‍यता आहे. प्रताप पाटील चिखलीकर हे पक्षबदलू असले तरी तळागाळातील लोकांमध्ये त्यांची चांगली प्रतिमा आहे. काम करणारा नेता म्हणून त्यांना ओळखले जाते.

अशोक चव्हाण यांनी अलीकडेच झालेल्या महानगरपालिका निवडणुकांत कॉंग्रेसला विजय मिळवून दिला. नांदेडमध्ये चव्हाण कुटुंबीयांबद्दल सहानुभूती आहे. मराठवाड्याचे एक संयमी, खंबीर नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
प्रताप पाटील यांनी आता निवडणूक प्रचारातही चांगली आघाडी घेतली आहे. त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची मजबूत फळी आहे. या निवडणुकीत संघ, भाजपने प्रामाणिक प्रयत्न केले तर प्रताप पाटील चिखलीकर यांच्याबाबतीत चमत्कार घडू शकेल. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यासंदर्भात व्हायरल झालेली क्‍लिप ही त्यांच्यादृष्टीने घातक ठरू शकते. त्यांच्याभोवतीच्या चांडाळचौकडीला आता नांदेडमधील लोक कंटाळले आहेत. अशोक चव्हाणांकडे कार्यकर्तेही नाहीत. अशोक चव्हाणांचे मेव्हणे माजी खासदार खतगावकर यांनी भाजपात प्रवेश केला आहे. ही बाबही चव्हाणांना अडचणीची ठरू शकणारी आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.