Nanded News : नांदेड पुन्हा हादरलं ! पॅरोलवर सुटलेल्या आरोपीवर भरदिवसा गोळीबार

नांदेड : नांदेड जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. सोमवारी सकाळी नांदेड शहरात एका गुरुद्वाराबाहेर गोळीबार झाला. यामध्ये तीन जण जखमी झाले, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी खुनाच्या प्रकरणात पॅरोलवर सुटलेल्या आरोपी आणि त्याच्या साथीदारावर गोळीबार केला. नांदेड शहरातील शहीदपुरा भागात ही धक्कादायक घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोराने बेछूट गोळीबार केल्याने एकाच्या छातीत तर इतर दोघांच्या पाठीत गोळ्या लागल्या. या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, तसेच छातीत गोळी लागलेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. रविंद्रसिंघ राठोड असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. दोन्ही जखमींना विष्णुपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले असता रवींद्रसिंघ राठोड याचा मृत्यू झाला तर गुरमितसिंघ सेवादार याच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेची माहिती समजताच पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार, पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, स्थानिक गुन्हा शाखेचे उदय खंडेराय यासह मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाले होते. याप्रकरणी वजिराबाद पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. आरोपींना शोधण्यासाठी पोलीस प्रशासनाने विविध पथकांची स्थापना केल्याची माहिती पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी दिली.
दरम्यान, अधिकारी गोळीबारामागील हेतू तपासत आहेत. तसेच संशयिताला पकडण्यासाठी पोलिसांनी पथक तयार केली आहेत. गोळीबाराच्या घटनेने नांदेड शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेत जखमी झालेला गुरमितसिंघ सेवादार हा एका खून प्रकरणातील आरोपी आहे. बारा दिवसांपूर्वी तो पॅरोलवर सुटला होता. या घटनेचा अधिक तपास करण्यासाठी पोलिस परिसरातील सीसीटीव्ही फुटेस तपासत आहेत.





