Nanded News : निरोप समारंभातील गायन कला आली अंगलट; तहसीलदाराचे निलंबन

नांदेड : महसूल विभागाच्या विभागीय व राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवादरम्यान गायन-वादन किंवा अन्य कला सादर करणारे अधिकारी-कर्मचारी दाद मिळवून जातात. पण बदली झाल्यानंतर निरोप समारंभात खुर्चीवर बसून गायन कला सादर करण्याची कृती तहसीलदार प्रशांत थोरात यांच्या अंगलट आली आहे. नांदेड जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालावरून विभागीय आयुक्तांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.
प्रशांत थोरात हे नांदेड जिल्ह्यातील उमरी येथे कार्यरत होते. गेल्या महिन्यात लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे त्यांची बदली करण्यात आहे. यानंतर ३० जुलै रोजी ते उमरी येथून कार्यमुक्त झाले होते. यानिमित्त उमरी तहसील कार्यालयातर्फे ८ ऑगस्ट रोजी त्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभादरम्यान थोरात यांनी खुर्चीत बसून गाणे गायले. या प्रसंगाचा व्हिडिओ नंतर समाजमाध्यमांतून व्हायरल झाला.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले. प्रशांत थोरात यांच्या कृतीमुळे शासनाची प्रतिमा मलिन झाली आहे. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, असा अहवाल नांदेड जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. त्यावरून विभागीय आयुक्तांनी तहसीलदार प्रशांत थोरात यांच्या निलंबनाचे आदेश दिले. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.





