Nanded Municipal Corporation Election Result : राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल जवळपास स्पष्ट झाले असून बहुतांश महापालिकांमध्ये भाजपाने वर्चस्व सिद्ध केले आहे. मुंबई, पुणे यांसारख्या महत्त्वाच्या महापालिकांमध्येही भाजपाच सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मुंबईत महायुती व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्ता येणार हे जवळपास निश्चित झाले असून पुण्यातही भाजपाच महापौरपद मिळवणार आहे. अशातच नांदेड महानगरपालिकेचा निकाल समोर आला असून या निकालाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. नांदेडमध्ये भाजपाने सर्वात मोठा पक्ष म्हणून बाजी मारली असून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला एकही जागा मिळवता आलेली नाही. नेमका निकाल काय? नांदेड महानगरपालिकेच्या एकूण 81 जागांसाठी निवडणूक झाली होती. आतापर्यंतच्या निकालानुसार भाजपाने 40 जागांवर थेट विजय मिळवला असून आणखी 5 जागांवर आघाडी घेतली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 1 जागेवर विजय मिळाला असून 6 जागांवर आघाडी आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एकूण 7 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस व मित्रपक्षांनी 6 जागांवर विजय मिळवला असून 4 जागांवर आघाडी घेतली आहे. तर एमआयएम पक्षाचे 4 उमेदवार विजयी झाले आहेत. अशोक चव्हाणांनी गड राखला नांदेड महानगरपालिका निवडणूक भाजपासाठी प्रतिष्ठेची मानली जात होती. खासदार अशोक चव्हाण यांनी या निवडणुकीसाठी मोठी ताकद पणाला लावत सभा, बैठका आणि जनसंपर्कावर भर दिला होता. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी घरोघरी पोहोचण्याचा प्रयत्न केला. ही निवडणूक अशोक चव्हाण यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई मानली जात होती. निकालानंतर भाजपाने 81 पैकी 40 जागांवर विजय मिळवत स्पष्ट आघाडी घेतली आहे. त्यामुळे नांदेडमध्ये भाजपाचाच महापौर होणार हे आता निश्चित झाले आहे.