Pune News : आज भारतातील डेअरी उद्योगात तंत्रज्ञानाचा वापर वेगाने वाढताना दिसतो; मात्र या परिवर्तनामागील व्यक्तींचा उल्लेख क्वचितच होतो. व्यावसायिक दूरदृष्टी,जिद्द व अथक परिश्रमांच्या जोरावर देशातील डेअरी उद्योगाला विकास व तंत्रज्ञानाची दिशा देणारे परशुराम अर्थात् नानासाहेब चितळे,हे खऱ्या अर्थाने या क्षेत्राचे आधुनिक शिल्पकार आहेत. २३ एप्रिल रोजी ते वयाची ९१ वर्षे पूर्ण करत आहेत;त्यानिमित्त त्यांचे कार्य दृष्टीक्षेपात. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात डेअरी उद्योगाचा पाया रचणारे भास्कर गणेश चितळे उर्फ बी. जी. चितळे यांच्या गुणवत्तेचा,सचोटीचा व श्रमांचा वारसा नानासाहेबांनी जपला. २१ शतकात आपल्याकडे डेअरी उद्योगात नवे तंत्रज्ञान आले आहे. पण, ६०-७० च्या दशकात विपरित परिस्थिती होती. अशाच काळात डेअरी उद्योगाला पुढे न्यायचे असेल,तर आधुनिक डेअरी व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे,हे नानासाहेबांनी तरुण वयातच ओळखले. त्यामुळेच बेंगळुरू येथील केंद्र सरकारच्या नॅशनल डेअरी संस्थेतून डेअरी डिप्लोमा करून चितळे डेअरीच्या आधुनिकीकरणासाठी नानासाहेबांनी बंधू काकासाहेबांबरोबर जोमाने काम सुरू केले. नवी दिशा साठ-सत्तरच्या दशकात पशुवैद्य आणि जनावरांसाठी पुरेशा आरोग्यसुविधा उपलब्ध नव्हत्या. त्यामुळेच नानासाहेबांनी आज ज्याला ‘पॅराव्हेट’ म्हणतात ते ज्ञान आत्मसात केले आणि गावोगावी फिरून पशूआरोग्य, प्रसुती व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले. दूध उत्पादन वाढीसाठी जनजागृती केली. गुजरातमधून महिसाणा व मुर्रा म्हशी;तसेच जर्सी व होल्स्टन गायी सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या. पण,उत्पादन वाढीसाठी मर्यादा आहे,हे त्यांना लक्षात आले होते. परदेशात दुधाचे उत्पादन आधुनिक पद्धतीने होत असल्याचे नानासाहेबांना माहीत होते. त्यामुळे तेथील तंत्रज्ञान वा पद्धत आपण भारतात वापरू शकतो का, हे पाहण्यासाठी १९७० च्या दशकात ब्रिटनसह युरोपातील अनेक देशांना भेटी दिल्या. त्यातूनच १९७४ मध्ये भारतात सर्वप्रथमच दुधाच्या पॅकिंगसाठी पॉलीथिन पाऊचचा वापर सुरू झाला तो चितळे डेअरीमुळेच. ग्राहकांपर्यंत दूध पोचविण्यासाठी क्रेट्सची निर्मिती व वाहतुकीसाठी इन्स्युलेटेड ट्रकची व्यवस्था केली. गाय-म्हशींचे दूध काढण्यासाठी मशीनचा वापर सुरू करण्यात आला आणि त्याचे प्रशिक्षण शेतकऱ्यांनाही देण्यात आले. तसेच,परदेशाप्रमाणे भारतात त्यांनी सर्वप्रथम गायी-म्हशींसाठी कृत्रिम रेतन सुविधा केंद्रही सुरू केले. यातूनच भारतातील डेअरी उद्योगाला दिशा मिळाली ती ब्रँडेड डेअरी उद्योग उभारणीची. समग्र विकासावर भर नाविन्य हा ध्यास असल्याने चितळे डेअरीने १९८४ मध्ये डेअरी उद्योगात प्रथमच कॉम्प्यूटरचा वापर सुरू करून देशात पहिल्यांदाच शेतकऱ्यांना दुधाची बिले कॉम्प्यूटरवरून देण्यास सुरुवात केली. त्यामुळे व्यवहारात पारदर्शकता वाढली आणि पुढे ब्रँडेड दूध व दुग्धजन्य उत्पादनांच्या वाढीस गती मिळाली. जनावरांच्या आरोग्यासाठी आरएफआयडी टॅगिंग, डेअरीच्या माध्यमातून पॅराव्हेट विभाग,स्थलांतर रोखण्याबरोबर तरुणांना दूध उत्पादनाचे प्रशिक्षण आदी अनेक उपक्रम राबविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. गुणवत्ता व आधुनिकीकरणामुळे दुग्ध उत्पादनासाठी पहिल्यांदा जेव्हा चितळे डेअरीला राष्ट्रीय गुणवत्ता पारितोषिक मिळाले, तेव्हा भिलवडीच्या ग्रामस्थांनी नानासाहेबांचा सत्कार केला होता. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी त्यांनी गावोगावी जाऊन विविध योजनांची माहिती दिली व कौशल्य शिबिरांचे आयोजन केले. आज चितळे डेअरीसोबत लाखो शेतकरी जोडले गेले असून,काही हजार लिटरपासून सुरू झालेली दूध प्रक्रिया आज लाखो लिटरपर्यंत पोहोचली आहे. सामाजिक योगदान स्थानिक पातळीवर विकास होण्यासाठी नानासाहेबांनी अनेक संस्था, क्रीडामंडळे व वाचनालयांना मोठ्या देणग्या दिल्या. भिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळात इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू झाली. मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी महाविद्यालय सुरू करण्याचा पुढाकार घेतला. ग्रामस्थांनी जितका निधी उभारला, तितकाच निधी डेअरीच्या वतीने देण्याचे त्यांनी जाहीर केले आणि त्यानुसार लाखो रुपयांची मदत दिली. त्यांच्या स्वतःच्या मुलांचे व नातवंडांचे शिक्षण भिलवडीतच झाले, यावरून तेथील शिक्षणाच्या गुणवत्तेची साक्ष मिळते. १९७२ च्या दुष्काळात त्यांनी मोफत वैद्यकीय सेवा, गोठवलेले वीर्य वितरण; तसेच बुलढाण्यावरून ४० वॅगन चारा जनावरांसाठी व दुष्काळग्रस्त गावांना पाणी टँकरद्वारे पुरवठा केला. सांगली येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनात ते खजिनदार होते. सुनामी आणि भूकंपग्रस्तांसाठीही त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या निधीत सढळ हाताने योगदान दिले. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. नानासाहेबांचे कार्य आणि योगदान, हे ‘महाराष्ट्र भूषण’ व ‘पद्मश्री’ पुरस्कारांनी सन्मानित करावे असेच आहे आणि ते व्हावे,अशी सर्वांची भावना आहे.