नाना पटोलेंचा खमक्या अंदाज; काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद स्वीकारण्यापूर्वीच दिला इशारा

मुंबई – एकीकडे कॉंग्रेस संघटनात्मक पातळीवर संघर्ष करीत असताना दुसरीकडे पक्ष मजबूत करण्यासाठी विविध फेरबदल करण्यास सुरुवात केली आहे. यातच महाराष्ट्रात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले यांच्या नावावर हायकमांडने अंतिम शिक्कामोर्तब केल्याची माहिती आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले देखील नवीन जबाबदारीसाठी तयार असल्याचे दिसत असून त्यांनी पद स्वीकारण्यापूर्वीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्ष होण्यापूर्वीच केलेल्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. नाना पटोले यांनी म्हटले की, जे काही संघटनात्मक निर्णय घेण्याचे अधिकार आमच्या पक्षात आहेत ते राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना आहेत. जी जबाबदारी मिळेल ती प्रामाणिकपणे पार पाडून पक्ष बळकट करण्यासाठी आणि पक्ष स्वबळावर महाराष्ट्रात सत्तेत कसा येईल, यासाठी प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्राला पुन्हा वैभव मिळवून देण्याचे काम काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केले जाईल, असंही ते म्हणाले.

वास्तविक पाहता, भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित येऊन राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन केली. महाविकास आघाडी सरकार भक्कम असून तिन्ही पक्ष पुढील निवडणुकांमध्येही एकत्र असतील, असे वारंवार तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून सांगितले जात असताना नाना पटोले यांनी राज्यात स्वबळावर पक्ष सत्तेत कसा येईल, असे सांगत सूचक वक्तव्य केले आहे. त्यामुळे पुढे महाविकास आघाडी अस्तित्वात राहिल का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.