नागपूर : जनतेचा आवाज बनून आम्ही आता जनआंदोलन सुरू करणार आहोत. जनतेला वाटत आहे की निवडणूक बॅलट पेपरवर घेण्यात यावी. बॅलट पेपरवरील निवडणुकांसाठी सह्यांची मोहीम आम्ही राबवणार आहोत. मतदान करण्याचा अधिकार आहे. मात्र मशीन आमचे मत चोरत असल्याची भावना जनतेत असल्याचे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले असून महायुतीने पुन्हा एकदा महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र, महायुतीला मिळालेल्या या यशावर महाविकास आघाडीने ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित केली आहे. तसेच निवडणुका बॅलट पेपरवर घेण्याची देखील मागणी केली जात आहे. पुढे बोलताना पटोले म्हणाले, राहुल गांधी यांच्या नेतृत्वात जनआंदोलन आम्ही सुरू करणार आहोत. तसेच आम्ही निर्णय घेतला आहे की राहुल गांधी यांचे जन आंदोलन हे महाराष्ट्रात सर्वात मोठ्या प्रमाणात असणार आहे, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली आहे.