Nana Patekar Net Worth: नाना पाटेकरांनी मागे ठेवली कोट्यवधींची संपत्ती; मुंबईतील 1BHK पासून पुण्यातील 27 एकर फार्महाऊसपर्यंत मालमत्ता
Nana Patekar Net Worth मीडिया रिपोर्ट्सनुसार, नाना पाटेकर यांची एकूण संपत्ती सुमारे 50 ते 80 कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याचे सांगितले जाते. त्यांच्या नावावर मुंबई, पुणे आणि गोवा येथे मालमत्ता असल्याची माहिती आहे. मात्र त्यांच्या संपत्तीपेक्षा साधेपणाने जगण्याच्या त्यांच्या पद्धतीची अधिक चर्चा झाली.

Nana Patekar Net Worth: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. वयाच्या 75व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जवळपास पाच दशकांच्या आपल्या अभिनय कारकिर्दीत नाना पाटेकर यांनी केवळ प्रसिद्धीच मिळवली नाही, तर कोट्यवधी रुपयांची संपत्तीही कमावली. मात्र एवढी संपत्ती असूनही त्यांची साधी राहणी नेहमीच चर्चेत राहिली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नाना पाटेकर यांची एकूण संपत्ती सुमारे 50 ते 80 कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याचे सांगितले जाते. त्यांच्या नावावर मुंबई, पुणे आणि गोवा येथे मालमत्ता असल्याची माहिती आहे. मात्र त्यांच्या संपत्तीपेक्षा साधेपणाने जगण्याच्या त्यांच्या पद्धतीची अधिक चर्चा झाली.
मुंबईत 750 चौरस फुटांचा 1BHK
नाना पाटेकर मुंबईतील अंधेरी परिसरात असलेल्या सुमारे 750 चौरस फुटांच्या 1BHK फ्लॅटमध्ये राहत होते. या घराची सध्याची किंमत सुमारे 3 कोटी रुपये असल्याचे रिपोर्ट्समध्ये नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, नानांनी हे घर अनेक वर्षांपूर्वी अवघ्या सुमारे 1.1 लाख रुपयांना खरेदी केल्याचे सांगितले जाते. ते आपल्या आईसोबतही याच घरात राहत होते. पुढे मोठी संपत्ती कमावल्यानंतरही त्यांनी आलिशान घराऐवजी याच साध्या घरात राहणे पसंत केले.
पुण्यात 27 एकरांचं फार्महाऊस
नाना पाटेकर यांच्या संपत्तीमध्ये पुण्यातील खडकवासला परिसरातील 27 एकरांच्या फार्महाऊसचाही समावेश असल्याचे सांगितले जाते. या ठिकाणी ते शेती करत होते. येथे गहू आणि भात यांसारखी पिके घेतली जात असल्याची माहिती आहे.
नाना पाटेकर यांना शेतीची विशेष आवड होती. रिपोर्ट्सनुसार, शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातील काही हिस्सा ते तेथे काम करणाऱ्या शेतकरी आणि मजुरांना देत असत. त्यामुळे शेतीशी त्यांचे केवळ आर्थिक नव्हे, तर भावनिक नातेही होते. याशिवाय पुण्यातील लॉ कॉलेज रोड परिसरात आणि गोव्यातही त्यांची मालमत्ता असल्याची माहिती विविध रिपोर्ट्समध्ये देण्यात आली आहे.
Nana Patekar
चित्रपटांसाठी कोट्यवधींची फी
नाना पाटेकर यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले. ‘परिंदा’, ‘क्रांतिवीर’, ‘प्रहार’, ‘वेलकम’, ‘नटसम्राट’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.
रिपोर्ट्सनुसार, नाना पाटेकर एका चित्रपटासाठी सुमारे 2 ते 3 कोटी रुपये मानधन घेत असल्याचे सांगितले जात होते. त्यांच्या कार कलेक्शनमध्ये महिंद्रा जीप CJ4, ऑडी Q7 आणि महिंद्रा स्कॉर्पिओ यांसारख्या गाड्यांचा समावेश असल्याचेही रिपोर्ट्समध्ये नमूद करण्यात आले आहे.
13व्या वर्षी सुरू केला संघर्ष
नाना पाटेकर यांचे बालपण मात्र अत्यंत संघर्षमय होते. आर्थिक परिस्थितीमुळे त्यांनी वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी काम करण्यास सुरुवात केली. ते चित्रपटांची पोस्टर्स रंगवायचे आणि त्यासाठी त्यांना महिन्याला सुमारे 35 रुपये मिळायचे.
याच संघर्षातून पुढे त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले. 1978 मध्ये ‘गमन’ या चित्रपटातून त्यांच्या सिनेसृष्टीतील प्रवासाला सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केली.
कोट्यवधींची संपत्ती असूनही साधेपणाने जगणारे नाना पाटेकर त्यांच्या अभिनयासोबतच त्यांच्या साध्या राहणीसाठीही कायम लक्षात राहतील. संघर्षातून सुरू झालेला त्यांचा प्रवास यशाच्या शिखरापर्यंत पोहोचला आणि त्यांनी आपल्या मागे अभिनयाचा मोठा वारसा सोडला.





