नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने आज आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित असणारा बायोपिक ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट लोकसभा निवडणुका संपेपर्यंत प्रदर्शित केला जाऊ नये असा निर्णय दिला आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील चित्रपट प्रदर्शित झाल्यास त्याचा एका विशिष्ठ पक्षास फायदा होऊन आदर्श आचारसंहितेचा भंग पावण्याची शक्यता असल्याने हा चित्रपट प्रदर्शित करू नये असं निवडणूक आयोगाने म्हंटलं होतं.
दरम्यान, निवडणूक आयोगाचा हा निर्णय पंप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षाचा प्रचार करणाऱ्या ‘नमो टीव्ही’ला देखील लागू असल्याचं वृत्त एका प्रसिद्ध वृत्त संकेतस्थळाने निवडणूक आयोगामधील सूत्रांच्या हवाल्याने दिलं आहे. या वृत्तानुसार निवडणूक आयोगाने ज्या प्रमाणे ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग पावण्याची शक्यता असल्याचं कारण देत बंदी घातली आहे त्याचप्रमाणे ही बंदी ‘नमो टीव्ही’वर देखील लादण्यात येणार आहे.
तत्पूर्वी, सर्वोच्च न्यायालयाने ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्याची मागणी करणारी विरोधकांची याचिकी फेटाळली होती. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबतचा निर्णय निवडणूक आयोगाने घ्यावा असे निर्देश दिले होते.