Agriculture News : शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली! नमो शेतकरी सन्मानचे 2 हजार रुपये खात्यात जमा; ‘या’ प्रकारे करा स्टेटस चेक

नवी दिल्ली : राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचे वितरण आजपासून सुरू झाले आहे. काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसेदेखील जमा झाले आहेत. विशेष म्हणजे काही लाभार्थ्यांना मागील थकीत हप्ते देखील एकत्र मिळाले आहेत.
शेतकऱ्यांना दिलासा
राज्यातील शेतकरी गेल्या अनेक महिन्यांपासून नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होते. 24 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता वितरित करण्यात आला. त्यावेळी अनेकांना नमो शेतकरी निधीचाही हप्ता मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र तो मिळाला नाही. त्यामुळे अनेक शेतकरी नाराज होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने शासनाकडे यासंदर्भात विचारणा केली जात होती.
यानंतर राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मागणीला प्रतिसाद देत नमो शेतकरी सन्मान निधीच्या सहाव्या हप्त्याच्या वितरणासाठी निधी मंजूर केला. हा निधी ३१ मार्चपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे विलंब झाला. अखेर 2 एप्रिल 2025 पासून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असून, एकूण 2170 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.
थकीत हफ्ते देखील भेटणार
मार्च महिन्याच्या अखेरीस बँक प्रक्रियेमुळे आणि काही तांत्रिक कारणांमुळे शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता जमा होऊ शकला नव्हता. मात्र, आता शासनाने त्वरित पावले उचलत थकीत हप्ते आणि सहावा हप्ता दोन्ही एकत्र वितरित करण्यास सुरुवात केली आहे.अनेक शेतकऱ्यांना यापूर्वी 2 ते 3 हप्ते प्राप्त झाले होते, तर काहींना एकही हप्ता मिळालेला नव्हता. काहींना 5 हप्ते मिळाले होते, मात्र उर्वरित रक्कम येणे बाकी होते. अशा सर्व शेतकऱ्यांना आता थकलेले हप्ते आणि सहावा हप्ता दोन्ही एकत्र जमा होत असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
शेतकऱ्यांनी आपल्या हफ्त्याची स्थिती कशी चेक करावी?
१) यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईट https://nsmny.mahait.org/ साईट ला भेट द्यावी लागेल.
२) यानंतर कोपऱ्यात “Beneficiary Status” या पर्यायावर क्लिक करा.
३) यानंतर त्या ठिकाणी आपला नोंदणी क्रमांक किंवा मोबाईल नंबर प्रविष्ट करा.
४) मोबाईल नंबर टाकल्यानंतर OTP प्राप्त होईल, तो समोर दिलेल्या बॉक्समध्ये टाका.
५) यानंतर खाली दिलेला कॅप्चा कोड अचूक भरा.
६) यानंतर “Get Data” बटणावर क्लिक करा.
७) यानंतर तुम्हाला तुमचे नाव आणि पत्ता, आतापर्यंत मिळालेले हप्ते, तसेच हप्ता न मिळाल्यास त्याचे कारण तुम्हाला दिसेल.





