नवी दिल्ली : BCCI ने काही दिवसांपूर्वी भारतीय संघाचं 2024 वर्षातील वेळापत्रक जाहीर केलं आहे. ठरलेल्या वेळापत्रकानुसार, भारतीय संघ मायदेशात न्यूझीलंड आणि बांगलादेशचा सामना करणार आहे. तर दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या संघांच्या दौऱ्यावर जाणार आहे. यादरम्यान दक्षिण आफ्रिकेने भारत-दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेची पोस्ट शेअर करताच नामिबियाच्या कर्णधाराने बीसीसीआयकडे खास मागणी केली आहे. काय केली मागणी? भारतीय संघ नोव्हेंबर महिन्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ 4 टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. हे सामने 8,10,13 आणि 15 नोव्हेंबर रोजी खेळले जाणार आहेत. या मालिकेची घोषणा होताच नामिबियाचा कर्णधार गेरहार्ड इरास्मसने पोस्ट शेअर करत अजब गजब मागणी केली आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. गेरहार्ड इरास्मसने भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिका सुरु होण्यापूर्वी नामिबियाची राजधानी विंडहोकमध्ये सराव सामना खेळवण्याची मागणी केली आहे. त्याने पोस्ट शेअर करत,’ BCCI, विंडहोकमध्ये सराव सामना?’ असं लिहिलं आहे. नामिबियाची आयसीसी टी-20 वर्ल्डकप 2024 मधील कामगिरी नामिबियाला आयसीसी टी-20 वर्ल्डकप 2024स्पर्धेत नामिबियाला केवळ 1 सामना जिंकता आला होता. त्यामुळे 2026 टी-20 वर्ल्डकप खेळण्यासाठी नामिबियाला क्लालिफायरचे सामने खेळावे लागणार आहेत.