शहरात नामांकित शिक्षण संस्था आणण्यात आ. लांडगे यांना यश 

पिंपरी  – पुणे हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. पिंपरी चिंचवड सुद्धा एज्युकेशनल हब म्हणून ओळखले जावे, असा संकल्प आमदार महेश लांडगे यांनी केला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये नामांकित शिक्षण संस्था याव्यात, यासाठी त्यांनी सरकारकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून चिखले येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय होणार असल्याचे प्रतिपादन पिंपरी चिंचवडचे महापौर राहुल जाधव यांनी येथे केले.

भोसरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ मोशी येथे झालेल्या कोपरा सभेत आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी महापौर राहुल जाधव, ज्येष्ठ नेत्या उमा खापरे, भाजपचे नगरसेवक बाबू नायर, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख इरफान सय्यद, उपजिल्हा प्रमुख निलेश मुटके, भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, युवा सेनेचे कुणाल जगनाडे, सचिन सानप, परशुराम आल्हाट, योगेश बोराटे, वैशाली खाड्ये आदी उपस्थित होते.

यावेळी महापौर जाधव म्हणाले की, पुणे हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. राज्यासह देश विदेशातून या ठिकाणी विद्यार्थी शिक्षणासाठी येत आहेत. मात्र याच पुण्याच्या भाग असलेले आणि आता वेगाने विकसित होणारे पिंपरी चिंचवडसुद्धा एज्युकेशनल हब म्हणून ओळखले जावे असा संकल्प आमदार महेश लांडगे यांनी केला आहे.

त्यासाठी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज, डेक्कन एज्यूकेशन सोसायटीचे बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स (बीएमसीसी), सर परशुराम महाविद्यालय, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरशी (एसएनडीटी) महाविद्यालय अशा नामांकित संस्थांच्या शाखा पिंपरी चिंचवडमध्ये उभारल्या जाव्यात, यासाठी आमदार लांडगे राज्य सरकारकडे पाठपुरावा करत आहेत. राज्य सरकारच्या नगररचना विभागाच्या सकारात्मक भूमिकेमुळे शहरात पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील 5 एकर क्षेत्रफळाचे 5 भूखंड राखीव करण्यात आले आहेत, असे महापौर म्हणाले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)