राजकीय फायद्यासाठी आरोपपत्रात नाव घातले; रोहित पवारांचा खुलासा

पुणे – मी काहीही चुकीचे केले नसून राजकीय फायद्यासाठी मला यात अडकवलं जात असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे. राज्य सहकारी बँकेच्या (एमपीसीबी) घोटाळाप्रकरणी ईडीने आरोपपत्र दाखल केल्यावर ते बोलत होते. एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांनी आणि संचालकांनी सहकारी साखर कारखान्यांची कवडीमोल भावाने नातेवाईकांना विक्री केल्याबद्दल हे आरोपपत्र दाखल झाले आहे.
रोहित पवार म्हणाले की, जेव्हा ईडीने कारखाना खरेदीतील गैरव्यवहाराप्रकरणी एफआयआर नोंदवला, तेव्हा त्यात काही राजकीय नेत्यांसह ९७ जणांची नावे होती. माझे नाव त्यात नव्हते. ते मुद्दाम घातले आहे. बारामती अॅग्रोने साखर कारखाना खरेदी करण्यावेळी तिथे निवडलेले संचालक मंडळ नसल्याने तो कारखाना रिझर्व बँकेच्या प्रशासकाच्या नियंत्रणाखाली होता. या बँकेच्या लिलिवाची निविदा प्रशासकानेच काढली होती. बारामती अॅग्रोने योग्य प्रक्रियेद्वारे निविदा मिळवली.
मला ईडीने २०२४ मध्ये दोनवेळा चौकशीसाठी बोलावले होते. त्यावेळी १२ तास चाललेल्या चौकशीत मी सर्व माहिती दिली होती. त्यांना जी काही माहिती द्यायची ती दिली आहे. आतादेखील हा कारखाना प्रतिकात्मक पद्धतीने ईडीकडे असला तरी माझ्या कंपनीकडून चालवला जातो. कोणत्याही शेतकऱ्याला याचा त्रास होणार नाही. नव्याने दाखल झालेले आरोपपत्र वेळ मर्यादेमुळे दाखल करण्यात आले आहे. आता न्यायालयात न्याय मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.




