लग्नानंतर अवघ्या काही तासांतच वर-वधूचा दुःखद अंत! 2 कुटुंबांवर क्षणार्धात कोसळला दुःखाचा डोंगर

नालंदा – बिहारच्या नालंदा जिल्ह्यात लग्नानंतर अवघ्या काही तासांतच वर-वधूचा दुःखद अंत झाला. त्यानंतर एका क्षणातच 2 कुटुंबांच्या आनंदावर दुःखाचे विरजन पडले. ज्या कारमधून नवरदेव आपल्या नवरीला घेऊन जात होता, त्या कारला एका वेगवान ट्रॅक्टरने जोराची धडक मारली. त्यामुळे रस्त्याच्या शेजारी फेकलेल्या कारमध्ये बसलेल्या वधू-वराचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात वराचा मेहुणा गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून ट्रॅक्टरसह फरार चालकाचा शोध सुरू केला आहे. बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील गिरियाक पोलिस टाणे हद्दीतील पुरानी गावाजवळ ही दुर्दैवी घटना घडली. यासंबंधीच्या माहितीनुसार, शुक्रवारी गिरियाकच्या सतुआ गावातील कारू चौधरी यांची मुलगी पुष्पा कुमारी (20 वर्षे) हिचा विवाह नवादाच्या महराना गावच्या श्याम कुमार (27 वर्षे) यांच्याशी झाला.
शनिवारी दुपारी पुष्पा यांची पाठवणी करण्यात आली. इनोव्हा कारमधून श्याम आपली नववधू पुष्पा व मेहुण्यासह महराना गावाकडे निघाला होता. दुपारी 3-4 च्या सुमारास त्यांची कार पुरैनी गावाजवळ आली. तिथे वाळूची वाहतूक करणाऱ्या भरधाव वेगातील एका ट्रॅक्टरने कारला जोरदार धडक दिली. त्यात कार रस्त्याच्या खाली उतरली. या घटनेत वर श्याम व नववधू पुष्पा यांचा जागीच मृत्यू झाला. तर श्यामचा मेहुणा व गाडीचा चालक गंभीर जखमी झाला.
या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून वधू-वरांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिले. तसेच गंभीर जखमी मेहुण्याला उपचारासाठी विम्स रुग्णालयात दाखल केले. कारला धडक दिल्यानंतर आरोपी चालक ट्रॅक्टरसह पळून गेला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.





