वसई : रविवारी रात्री नालासोपारा पूर्वेच्या यशवंत हाईट्स जवळील मुख्य रस्त्यावर अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या नायजेरियन महिलेला अटक करण्यात आली आहे. व्हिक्ट्री अबेके (२३) असे महिलेचे नाव असून तिच्याकडून १ कोटी ६० लाखांचा मॅफेड्रोन नावाचा अमली पदार्थ जप्त केला आहे. वसई विरार शहरातील विविध ठिकाणच्या भागात छुप्या मार्गाने अंमलीपदार्थांची तस्करी होत असल्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. रविवारी नालासोपारा पूर्वेच्या यशवंत हाईट्स जवळील परिसरात एक महिला अमली पदार्थ तस्करी करण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी सापळा रचून संशयित नायजेरियन महिलेला ताब्यात घेवून तिची झडती घेतली असता तिच्या बॅगेत मॅफेड्रोन नावाचा अमली पदार्थ आढळून आला आहे. सुमारे ८०० ग्रॅम वजन असलेला १ कोटी ६० लाख रुपये किंमतीचा अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी व्हिक्ट्री अबेके विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी तुळींज पोलिसांनी नालासोपारा पूर्वेच्या प्रगतीनगर मधील राहत्या घरात अमली पदार्थ तयार करणारा कारखाना उध्वस्त केला होता. त्यावेळी ५.६० कोटींचे अमली पदार्थ जप्त केले होते.