मुख्यमंत्री पदाची धुरा हाती घेताच नायब सिंग सैनी यांचा मोठा निर्णय; ‘या’ रुग्णांसाठी ठरणार उपयुक्त

Haryana CM Nayab Singh Saini | हरियाणात भाजप नेते नायब सिंग सैनी यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली आहे. मुख्यमंत्री पदाचा कार्यभार हाती घेताच मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. सीएम सैनी यांनी अशा फाईलवर सर्वप्रथम स्वाक्षरी केली आहे, ज्यामुळे राज्यातील सर्वसामान्यांना उपचारासाठी मोठा फायदा होणार आहे.
मोफत डायलिसिस सेवा उपलब्ध
राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात किडनीच्या गंभीर रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. मोफत डायलिसिस सेवा उपलब्ध असेल. तसेच, भविष्यात सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये मोफत डायलिसिसची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे, असे नायब सिंह सैनी यांनी सांगितले. त्यांच्या या निर्णयामुळे राज्यातील जनतेला मोठा फायदा होणार आहे.
सैनी यांचा विरोधकांवर हल्लाबोल
सीएम सैनी म्हणाले, ‘आमच्या सरकारने गेल्या दहा वर्षांत खूप काम केले आहे. विरोधकांनी नरेटीव्ह सेट केला पण सर्वसामान्यांनी ते मोडीत काढले. शेतकऱ्यांना भडकवण्याचे काम करण्यात आले. तरुणांना अविश्वासाच्या दरीत ढकलण्याचे काम विरोधकांनी केले.”
रोजगाराच्या मुद्द्यावर सैनी म्हणाले की, “आज मीही यात जॉइन झालो आहे. राज्यातील पंचवीस हजार तरुणही नव्या नोकऱ्यांमध्ये रुजू झाले आहेत. गुन्हेगारांनी एकतर गुन्हा सोडावा, नाही तर गुन्हेगारांनी हरियाणा सोडावे, अन्यथा त्यांना सोडले जाणार नाही,” असा इशारा मुख्यमंत्री नायब सैनी यांनी दिला.
दरम्यान, गुरुवारी 17 ऑक्टोबर रोजी नायब सिंग सैनी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पंचकुला येथील दशहरा मैदानात हा शपथविधीचा कार्यक्रम झाला. यावेळी नायब सिंह सैनी यांच्यासह 14 आमदारांनी कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नायब सिंह सैनी यांच्या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह, जे. पी. नड्डा यांच्यासह इतर मंत्री उपस्थित होते.
हेही वाचा:





