Nagpur Violence – औरंगजेब कबरीच्या वादावरून सोमवारी रात्री 8:30 वाजता नागपूरच्या महाल परिसरात हिंसाचार उसळला. विश्व हिंदू परिषदेने (विहिंप) मुघल सम्राट औरंगजेबाचा पुतळा जाळला आणि त्याची कबर पाडण्याची मागणी केली. यानंतर दगडफेक आणि तोडफोड सुरू झाली.
दंगलखोरांनी घरांवर दगडफेक केली आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या वाहनांना आग लावली. पोलिसांवरही हल्ला झाला. कुऱ्हाडीच्या हल्ल्यात डीसीपी निकेतन कदम जखमी झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या आणि 55 हून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
राज्याच गुप्तचर खात झोपलंय का? – दानवे
नागपूर मधील महाल येथे काल तणावपूर्ण निर्माण झालेली स्थिती ही राज्याच्या दृष्टीने भूषणावाह नाही. गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात अशाप्रकारे जाळपोळीची घटना घडली. या दंगलीचे लोण दुसरीकडे पोहचता कामा नये. जिल्ह्यात धार्मिक उन्माद होत असताना राज्याच गुप्तचर खात झोपलेलं आहे का? नागरिकांनी फोन करूनही पोलीस रात्री उशिरा घटनास्थळी पोहचले. काही मंत्री दंगल भडकविण्याचं आणि जातीयवाद पसरविण्याचे काम करतात. त्या मंत्र्यांच तोंड शिवले पाहिजे, यामुळे अशी स्थिती निर्माण होते, अशी मागणी अंबादास दानवेंनी सभागृहात केली आहे.
जखमी पोलिस अधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद
नागपूर येथील कालच्या घटनेत जखमी झालेले पोलिस उपायुक्त निकेतन कदम यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधला आणि लवकर बरे होण्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
नागपुरातील घटना पूर्वनियोजित कट – एकनाथ शिंदे
नागपुरातील हिंसाचार एक पूर्वनियोजित घटना असल्याचा संशय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधानसभा परिसरात बोलताना व्यक्त केला. ते म्हणाले, या भागात दररोज 100 ते 150 दुचाकी पार्क होतात. पण तिथे काल एकही गाडी पार्क नव्हती. इतर दुचाकी आणि चारचाकी जाळून टाकल्या गेल्या. मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली. हॉस्पिटलला लक्ष्य करण्यात आले. एक 5 वर्षीय मुलगी बालंबाल बचावली. फायर ब्रिगेडची गाडी जाळली, पोलिसांवर हल्ला केला, असेही ते म्हणाले.
घटनेकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहू नका – बावनकुळे
नागपूर शहराने कायमच सर्व समाजात एकोपा ठेवला आहे. तसेच या पुढे देखील कायम ठेवावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. विरोधी पक्षाने देखील या घटनेकडे राजकीय दृष्टिकोनातून न पाहता नागपूर शहर शांत राहण्यासाठी आव्हान करत असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
47 जण ताब्यात – गृहराज्यमंत्री
या घटने प्रकरणी आत्तापर्यंत 47 जण ताब्यात असल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली. 12 ते 14 पोलीस कर्मचारी जखमी झाले असून 2-3 नागरिकही जखमी झाले आहेत. हिंसाचाराची कारणे तपासली जात आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे कदम यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची करण्याची ग्वाही दिली आहे.