नागपूर : नागपूर शहराच्या महाल परिसरात मार्च 17 रोजी दोन गटात झालेल्या दगडफेकीनंतर दंगल उसळली होती. हिंसाचार प्रकरणातील आरोपी हमीद इंजिनिअरला नागपूर सत्र न्यायालयाने जामीनावर सोडण्याचे आदेश दिले आहेत. 50 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीनावर मुक्त करण्याचे हे आदेश देण्यात आले असून उद्या (22 एप्रिल) कारागृहातून सुटका होण्याची शक्यता आहे. नागपूर हिंसाचार प्रकरणात सोशल मीडियावर दंगल भडकवणारे व्हिडिओ टाकण्यामागे हमीद इंजिनिअरचा कट असल्याच्या आरोपाखाली पोलीसांनी त्याला अटक केली होती. नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप असलेल्या फहिम खानच्या जामिनावर बुधवारी न्यायालयात सुनावणी होणार असून सध्या फहीम खान न्यायालयीन कोठडीत आहे. हमीद इंजिनिअर मायनॉरीटी डेमोक्रॅटीक पक्षाचा कार्याध्यक्ष आहे. नागपूरातील दंगल प्रकरणात कट रचल्याचा त्याच्यावर आरोप आहे. औरंगजेब समर्थक म्हणून त्याची ओळख आहे. सोशल मिडिया मीडियावर भडकवणारे व्हिडिओ टाकल्याचा आरोप त्याच्यावर आहे. ज्या भागात हिंसाचार घडला त्याच परिसरात हमीद इंजिनिअर राहतो.