Maharashtra Kesari Championship 2027: तब्बल 13 वर्षानंतर उपराजधानीत रंगणार ‘महाराष्ट्र केसरी’चा थरार! तारीख आली समोर
तब्बल 13 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर कुस्ती क्षेत्रातील अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या 'महाराष्ट्र केसरी' कुस्ती स्पर्धेचे यजमानपद (Maharashtra Kesari Championship 2027) नागपूर शहराला मिळाले आहे.

Maharashtra Kesari Championship 2027 : महाराष्ट्राच्या लाल मातीत रुजलेली रांगडी कुस्तीची परंपरा आणि मल्लांच्या अफाट ताकदीचा थरार अनुभवण्यासाठी उपराजधानी नागपूर सज्ज झाली आहे. तब्बल 13 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर कुस्ती क्षेत्रातील अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेचे यजमानपद (Maharashtra Kesari Championship 2027) नागपूर शहराला मिळाले आहे.
येत्या २० ते २४ जानेवारी २०२७ या कालावधीत नागपूरच्या आखाड्यात कुस्तीचा हा भव्य महासंग्राम रंगणार असून, संपूर्ण राज्यातील कुस्तीप्रेमींच्या नजरा आता या स्पर्धेकडे खिळल्या आहेत.
नागपूर महानगरपालिका आणि नागपूर कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे (Maharashtra Kesari Championship 2027) दिमाखदार आयोजन करण्यात आले आहे. लकडगंज परिसरातील सरदार वल्लभभाई पटेल मैदानावर महाराष्ट्र केसरीचा हा मुख्य आखाडा सजणार आहे. तब्बल १३ वर्षांनंतर आपल्याच शहरात ही स्पर्धा होत असल्याने नागपूरकर क्रीडाप्रेमी आणि स्थानिक मल्लांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
या महास्पर्धेत राज्यातील तब्बल ४२ शहरे आणि विविध तालीम संघांमधील मल्ल सहभागी होणार असून, सुमारे १३०० कुस्तीपटू आपले कौशल्य आणि ताकद पणाला लावून प्रतिस्पर्ध्यांना आव्हान देतील. त्यामुळे विविध वजनगटांतील अत्यंत चुरशीच्या आणि श्वास रोखून धरणाऱ्या लढती पाहण्याची सुवर्णसंधी प्रेक्षकांना मिळणार आहे.
स्पर्धेच्या भव्य आयोजनासाठी मैदानावर विशेष जय्यत तयारी करण्यात येत असून, या ठिकाणी दोन आधुनिक मॅटचे आखाडे आणि दोन पारंपरिक लाल मातीचे आखाडे तयार केले जाणार आहेत. यामुळे प्रेक्षकांना आधुनिक कुस्तीतील तांत्रिक डावपेचांसोबतच अस्सल मातीतील कुस्तीचा रांगडा थरारही एकाच वेळी अनुभवता येणार आहे. खेळाडूंसाठी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर आयोजकांचा विशेष भर आहे.
महाराष्ट्र केसरी हा किताब पटकावणे हे राज्यातील प्रत्येक मल्लाचे सर्वोच्च स्वप्न असते. त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या या दिग्गज मल्लांमधून कोण आपल्या ताकदीच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना अस्मान दाखवून मानाची गदा उंचावणार, याची मोठी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस यांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ वर्षांनंतर नागपूरला मिळालेले हे यजमानपद कुस्तीप्रेमींसाठी (Maharashtra Kesari Championship 2027) मोठी पर्वणी असून, जानेवारीत होणाऱ्या या महासंग्राममुळे नागपुरात कुस्तीचा खऱ्या अर्थाने महाउत्सव रंगणार आहे.






