प्रभात वृत्तसेवा पुणे – आंबटगोड चवीची, केशरी-पिवळ्या रंगाची नागपूर संत्री म्हटल्यावर कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. या नागपूर संत्र्याचा हंगाम सुरू झाला आहे. मार्केट यार्डातील फळ विभागात आवक सुरू झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही नागपूर संत्र्यांना चांगली मागणी असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. फळांना पुरेसे ऊन न मिळाल्याने रंग आणि गोडी नीट निघालेली नाही. त्यामुळे संत्र्यांचा आंबटपणा वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. तीन महिने चालणारा संत्र्यांचा हंगाम यंदा दीड महिन्यातच संपण्याचा अंदाज आहे. यंदा लांबलेला मान्सून आणि परतीच्या पावसाचा वाढलेला मुक्काम यामुळे अनेक फळबागांना फटका बसला आहे. सततच्या पावसामुळे फळ गळती वाढली असून, माशीचा प्रादुर्भाव झाल्याने संत्र्यांचे ५० टक्क्यांपर्यंत नुकसान झाल्याची माहिती नागपूर संत्र्यांचे प्रमुख आडतदार करण जाधव यांनी दिली. परिणामी हंगाम अपेक्षेपेक्षा लवकर संपण्याची शक्यता आहे. रविवारी (दि. २६) पुणे बाजार समितीत सुमारे ७०० पेट्यांची आवक झाली. संत्र्यांच्या गुणवत्तेनुसार ८ ते ११ डझनाच्या पेटीला घाऊक बाजारात ८०० ते ११०० रुपये भाव मिळत आहे. मात्र, सततच्या पावसामुळे संत्र्यांची टिकवण क्षमता कमी झाली असून, दोन दिवसांतच फळांना पाणी सुटते. त्यामुळे व्यापाऱ्यांना तातडीने विक्री करावी लागत आहे. त्याचबरोबर खरेदीदारदेखील कमी प्रमाणात खरेदी करीत आहेत. नागपूरसह परतवाडा, अंजनगाव, अचलपूर, वरूड, चिखली, अमरावती या भागातून संत्र्याची आवक होत आहे.