नागपूर – एका बेरोजगार इसमाने आपली पत्नी आणि मुलीची हत्या करून नंतर स्वत:ही आत्महत्या करण्याचा प्रकार नागपुरातील राजीव नगर वसाहतीत घडला आहे. विलास गवते (50) यांनी आपली मुलगी अमृता (वय 13) आणि पत्नी रंजना (45) यांचा गळा चिरून हत्या केली आणि नंतर त्याने स्वत:च्या घराबाहेरील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांनी दिली.
आरोपी बेरोजगार असून क्षुल्लक कारणावरून त्याचे कुटुंबीयांशी भांडण होत असे, गवते दाम्पत्याला तीन मुले असून मोठ्या मुलीचे लग्न झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्या बारा वर्षाच्या मुलाला मात्र त्याने कोणतीही इजा केलेली नाही असेही आढळून आले आहे.
शुक्रवारी रात्री, हे जोडपे त्यांच्या 12 वर्षांचा मुलगा आणि मुलीसह घरात झोपले होते, तेव्हा आरोपीने धारदार शस्त्राने पत्नी आणि मुलीचा गळा चिरला, जेव्हा मुलगा जागा झाला आणि त्याने घरात रक्त पहिले तेव्हा त्याने शेजारी राहणाऱ्या त्याच्या काकांना या प्रकरणी माहिती दिल्यानंतर हा सारा प्रकार उघडकीला आला.