नागपूर : नागपूरमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. नागपूर विमानतळात स्फोट घडवू, अशा आशयाचा धमकीचा ई-मेल विमानतळ प्रशासनाला मिळाल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत नागपूर विमानतळावर स्फोट घडवण्यासंदर्भात धमकीचा ई-मेल आल्याची ही चौथी घटना आहे. वारंवार असे धमकीचे ई-मेल येत असल्यामुळं विमानतळ प्रशासन तसंच पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. धमकीचा मेल मिळाल्यानंतर विमानतळ प्रशासनानं तात्काळ पोलिसांना या संदर्भातील माहिती दिली. सध्या पोलिसांकडून विमानतळ परिसरात कसून तपासणी मोहीम राबवली जात आहे. तर धमकीचे ई-मेल वारंवार कोण पाठवतंय? याचा शोध घेण्यासाठी नागपूर पोलिसांची सायबर टीम करत आहे. वारंवार असे धमकीचे ईमेल येत असल्यामुळे विमानतळ प्रशासन तसेच पोलीस यांनी सुरक्षा व्यवस्था कडेकोट केली आहे. 2 महिन्यात 4 धमक्या विमानतळावर बॉम्ब असल्याच्या धमकीचा ई-मेल यापूर्वी 29 एप्रिल, 18 जून आणि काल म्हणजे 24 जूनला मिळाला होता. सोमवारी (24 जून) अधिकाऱ्यांना ई-मेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर नागपूर विमानतळाची सुरक्षा कर्मचाऱ्यांनी कसून झडती घेतली. परंतु, परिसरात काहीही संशयास्पद आढळलं नाही, असं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.