Nagpur Accident : नागपूरमध्ये भीषण अपघात; दोघांचा दुर्दैवी मृत्यू

नागपूर : वर्धा-नागपूर महामार्गावर दत्तपूर शिवारातील द इव्हेंट मंगल कार्यालयाजवळ शुक्रवारी रात्री एक भीषण अपघात झाला. अनियंत्रित झालेल्या कारने दुभाजक ओलांडून समोरून येणा-या कंटेनरला धडक दिल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरवरून वर्ध्याच्या दिशेने भरधाव वेगाने जात असलेली कार अचानक डिव्हायडर ओलांडून विरुद्ध दिशेने गेली. त्याच वेळी वर्ध्याकडून नागपूरच्या दिशेने येणारा कंटेनर जोरात आला आणि कारला समोरून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कमल ठाकूर आणि गजानन तिडके यांचा मृत्यू झाला.
कारचालक अवंतिका ठाकूर (२१ वर्षे), अनुप्रिया ठाकूर (४८ वर्षे) आणि दीपक हे तिघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर आचार्य विनोबा भावे सावंगी मेघे रुग्णालय येथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. ही दुर्घटना शुक्रवारी संध्याकाळी ७:४० वाजता घडली. भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृतांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.





