Nagma Birthday: १९९०च्या दशकात आपल्या अभिनयासोबतच सौंदर्यामुळे चर्चेत राहिलेल्या अभिनेत्रींच्या यादीत नगमाचे नाव आवर्जून घेतले जाते. हिंदी सिनेसोबतच तिने तमिळ, तेलुगू आणि भोजपुरी चित्रपटांतही काम केले. सलमान खान, अक्षय कुमार, अमिताभ बच्चन, अजय देवगण, शाहरुख खान, रजनीकांत, चिरंजीवी, नागार्जुन आणि रवि किशन यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांसोबत तिने स्क्रीन शेअर केली. नगमाचा जन्म २५ डिसेंबर १९७४ रोजी मुंबईत झाला. आज ती ५१ वर्षांची झाली आहे. तिच्या कुटुंबाची पार्श्वभूमी वेगळी आहे. तिची आई शमा काझी मुस्लिम धर्माची, तर वडील अरविंद प्रताप सिंह मोरारजी हे हिंदू धर्माचे होते. नगमाच्या बालपणीच तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. त्यानंतर तिच्या आईने चंदर सदाना यांच्याशी दुसरे लग्न केले. नगमाने वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. १९९० साली प्रदर्शित झालेल्या ‘बागी’ या चित्रपटातून तिने सलमान खानसोबत हिंदी सिनेमात पदार्पण केले. हा चित्रपट त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला. यानंतर तिने अक्षय कुमारसोबत ‘सुहाग’, शाहरुख खानसोबत ‘किंग अंकल’, संजय दत्तसोबत ‘चल मेरे भाई’, रजनीकांतसोबत ‘बाशा’, चिरंजीवीसोबत ‘घराना मोगुडु’, ‘रिक्शावोडु’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांत भूमिका केल्या. अक्षय कुमारसोबतच्या ‘गोरे गोरे मुखडे पे काला काला चश्मा’ या गाण्यामुळे ती विशेष लोकप्रिय झाली. नगमाला ९ भाषांचे ज्ञान असून तिने तब्बल १० भाषांतील चित्रपटांत काम केले आहे. सध्या नगमा काय करत आहे? चित्रपटसृष्टीपासून दूर गेल्यानंतर नगमाने राजकारणात प्रवेश केला. २००४ साली काँग्रेस पक्षात प्रवेश करून तिने सक्रिय राजकीय कारकीर्द सुरू केली. २०१४ मध्ये मेरठ लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून निवडणूक लढवली, मात्र तिला पराभवाला सामोरे जावे लागले. तरीही ती आजही काँग्रेस पक्षाशी जोडलेली असून राजकारणात सक्रिय आहे. चित्रपटसृष्टीतील यशस्वी प्रवासानंतर समाजकारण आणि राजकारणातही आपली वेगळी ओळख निर्माण करणारी नगमा आजही चर्चेत आहे.