भाग्यश्री फंडने पटकावला महिला महाराष्ट्र केसरीचा मान; पण शेवटी रंगला वाद

कोल्हापूर – कोल्हापूरमध्ये महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा गुरुवारी पार पडली. मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या स्पर्धेचा काल (गुरुवारी) अंतिम सामना झाला. अहमदनगरच्या भाग्यश्री फंडने महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेची गदा पटकावली. भाग्यश्रीने कोल्हापूरच्या अमृता पुजारी या महिला मल्लाचा पराभव करत विजय मिळवला. दिपाली भोसले चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कुस्ती स्पर्धेच्या निकालानंतर मात्र प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता.
कोल्हापुरातील खासबाग मैदानात दीपाली सय्यद भोसले चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं. यासाठी संपूर्ण राज्यातून मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत भाग्यश्रीने अमृताचा 2-2 ने पराभव करत महिला महाराष्ट्र केसरीच्या गदेवर आपलं नाव कोरलं.
मात्र अमृता पुजारीचे प्रशिक्षक आणि तिच्या पालकांनी या स्पर्धेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. ही स्पर्धा पूर्णपणे मॅनेज झाली होती असा आरोप करण्यात आला. याशिवाय आपल्यावर अन्याय झाल्याचे म्हणत आयोजकांवर टीका केली. यामुळे स्पर्धेच्या शेवटी वाद निर्माण झाला होता.
दरम्यान, विजेतेपद मिळाल्यानंतर अहमदनगरची भाग्यश्री फंडला बक्षीस म्हणून चांदीची गदा आणि चार चाकी देण्यात आली. तर प्रत्येक वजनी गटामध्ये पहिला क्रमांक आलेल्या महिला कुस्तीगिरांना दुचाकी बक्षीस म्हणून देण्यात आले. या स्पर्धेच्या अंतिम सामन्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे आणि पालकमंत्री दीपक केसरकर उपस्थित राहिले होते.




