Nagar: सर्वांना बरोबर घेऊन विकासकामे करणार- आमदार लंघे

चांदा : आपल्याला सर्वांना बरोबर घेऊनच विकास कामे करायची आहेत, असे प्रतिपादन आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी चांदा येथील एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
चांदा येथील गायकवाड वस्ती, बोरुडे वस्ती, चौरे वस्ती, थोरात वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन आ. विठ्ठलराव लंघे पाटील यांच्याहस्ते झाले. याप्रसंगी आमदार लंघे, अंकुशराव काळे, ऋषिकेश शेटे,सरपंच सुनंदा दहातोंडे आदींचा या परिसरातील शेतकऱ्यांनी सन्मान केला. आमदार लंघे म्हणाले की, स्व.अण्णांनी आम्हाला राजकारण हे निवडणुकीपुरतेच करायचे शिकविलेले आहे.
निवडणुका झाल्यानंतर सर्वांनी एकत्र येऊन टीम वर्कसारखे काम करायचे असते, अशी ही शिकवण अण्णांनी दिली. तालुक्यात रस्त्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, ते आपल्याला मार्गी लावायचे आहेत, असेही लंघे म्हणाले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन संभाजी गवळी यांनी केले तर आभार शहाराम थोरात यांनी मानले.





