राहाता : वाणी वस्ती (ता. कोपरगाव ) येथे आज दुपारी दुर्दैवी घटना घडली. इयत्ता ८ वीतील साहिल प्रशांत डोशी (वय १२ ) आणि इयत्ता १०वीमधील दिव्या प्रशांत डोशी (वय १५) ही दोन भावंडे शेताजवळील नवीन साठवण तलावात बुडाल्याची दु:खद घटना घडली. तलावात कालच निळवंडे धरणाच्या कॅनॉलमधून पाणी सोडण्यात आले होते. यावेळी ही दोन्ही मुले पाण्यात गेली असता खोल पाण्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच त्या मार्गाने जात असलेले माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी प्रसंगावधान राखून तत्काळ मदत कार्य सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी राहाता नगरपरिषद, शिर्डी नगरपरिषद, साईबाबा संस्थान शिर्डी येथील अग्निशमन विभाग तसेच तहसीलदार राहाता व राहाता पोलीस ठाण्याशी संपर्क साधून तातडीने मदत कार्य सुरू करण्याचे निर्देश दिले. प्रशांत डोशी यांना एक मुलगा, दोन मुली आणि पत्नी असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.