नगर – चांदगावात खुनाचा प्रयत्न करणारे दोघे आरोपी जेरबंद

नगर – शेवगाव तालुक्यातील चांदगाव येथे रस्त्याचे कारणावरून कुर्हाडी, लाकडी दांड्याने खुनाचा प्रयत्न करणारे दोघे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. त्यांना पुढील तपासाकामी शेवगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
महादेव अंकुश गायके (वय 20), गणेश जालिंदर गायके (दोघे. रा. बेलगाव, ता. शेवगाव), असे ताब्यात घेतलेल्या संशयीत आरोपीचे नाव आहे. फिर्यादी गोपीचंद पोपळे हे व त्यांची पत्नी तसेच मुलगा त्यांचे शातामध्ये खताचे वाहन येणार असल्याने रस्त्याची दुरूस्ती करतांना रामदास गायके व इतर ५ जणांनी तुम्ही रस्त्यात खड्डे का करता असे म्हणत फिर्यादीस कुर्हाडीने व लाकडी दांडा, व कोयत्याने जीवे ठार माण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा शेवगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. यातील फरार असलेले आरोपींचा शोध घेत असता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी महादेव गायके व गणेश गायके हा पाथर्डी तालुक्यातील वृध्देश्वर कारखाना परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचवून आरोपीस मोठ्या शिताफीने ताब्यात घेतली. ही कारवाई गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, संतोष लोढे, फुरकान शेख, रवींद्र घुगांसे, जालींदर माने, मयुर गायकवाड व उध्दव टेकाळे यांच्या पथकाने केली.





