पाथर्डी : पाथर्डी ते करंजी दरम्यान एसटी बसने पुणे जाणाऱ्या एका महिला प्रवाशाच्या बॅगेतून चोरट्याने तब्बल १३ लाख रुपये किमतीचे १३२.२१ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरल्याची धक्कादायक घटना २६ मे रोजी घडली. या घटनेने पाथर्डी बसस्थानक ‘चोरीचे हॉटस्पॉट’ बनल्याची चर्चा पुन्हा तीव्र झाली आहे. प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांच्या ढिसाळ कारवाईवर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. पंचफुला मोहन जाधव (वय ५५, कोळसांगवी, ता. पाथर्डी) या महिला बहीणच्या मुलाच्या लग्नासाठी गावी आल्या होत्या. २६ मे रोजी सकाळी १०.४५ वाजता त्या पाथर्डी नवीन बसस्थानकावरून पुण्याला जाणाऱ्या एसटी बसमध्ये बसल्या. बॅगेत ठेवलेले दागिने सुरक्षित असल्याची खात्री करून त्या बसल्या होत्या. मात्र, करंजी गावाजवळ ११.३० च्या सुमारास बॅगेची चैन उघडी दिसली आणि राणी हार (२२ ग्रॅम), मिनी गंठण (११ ग्रॅम), दोन ठुश्या (८.३ ग्रॅम), चार अंगठ्या (१७ ग्रॅम), चैन (१३.९२ ग्रॅम), साखळी गंठण (३५.९९ ग्रॅम), नेकलेस (९ ग्रॅम) आणि पोत (१५ ग्रॅम) असे एकूण १३२.२१ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले. या दागिन्यांची बाजारभावानुसार किंमत सुमारे १३ लाख रुपये आहे. चोरीचे हॉटस्पॉट बनले बसस्थानक पाथर्डी बसस्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे नसणे, प्रवाशांच्या सामानाची तपासणी न होणे आणि पोलिसांचा निष्क्रिय दृष्टिकोन यामुळे चोरट्यांचे फावले आहे. एसटी प्रवासादरम्यान चोरीच्या घटना आता नित्याच्या झाल्या असून, विशेषत: महिला चोरट्यांचा धुमाकूळ वाढला आहे. या घटनेनंतर पंचफुला जाधव यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असली, तरी ठोस कारवाईचा अभाव आणि तपासातील ढिसाळपणामुळे प्रवाशांमध्ये संताप आहे. वाढत्या चोऱ्यांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. स्थानिक गुन्हे शाखेकडून अपेक्षित उपाययोजना होत नसल्याने नागरिक आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. बसस्थानकांवर सीसीटीव्ही यंत्रणा, नियमित गस्त आणि सामान तपासणी यासारख्या उपाययोजनांची मागणी जोर धरत आहे. पोलिसांचा तपास ठप्प एस.टी. बस प्रवासात मौल्यवान वस्तू आणि दागिन्यांच्या चोरीच्या घटनांमध्ये महिला चोरट्यांचा सहभाग वाढत आहे. मात्र, पोलिसांकडून तपासाला गती नसल्याने चोरट्यांचे मनोबल वाढले आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी त्वरित आणि कठोर कारवाईची गरज आहे.