जामखेड : तालुक्यातील शिऊर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत मंजूर असलेल्या सामाजिक भवनाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असून, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी ठेकेदाराला पाठीशी घालत असून, त्यांच्यावर कारवाई करून इस्टिमेंटप्रमाणे काम करण्याची मागणी शिवसेनेचे तालुका उपप्रमुख पांडुरंग समुद्र यांनी निवेदनाद्वारे केली आहे. सामाजिक न्याय संजय शिरसाट यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले कि ,शिऊर येथे सामाजिक भवनाचे बांधकाम चालू आहे. हे काम विजय छगन शेळके यांच्या संस्थेकडे आहे. बांधकाम साईटवर त्याचा नातेवाईक असतो. ज्यावेळेस कॉलमचे खड्डे व फाउंडेशन केले, त्यावेळी पाण्याची कसलीच व्यवस्था केली नव्हती .वीस-पंचवीस दिवस पाणी मारताना कोणीही दिसले नाही. स्थानिक लोकांना कसलाच प्रतिसाद देत नाही. दोन वर्षापूर्वी वस्तीमध्ये बौद्ध विहाराचे काम झाले आहे ते पण असेच निकृष्ट दर्जाचे आहे. त्यावेळी समाजाने अनेक वेळा लेखी तक्रारी केल्या पण सा.बां. विभागाने ठेकेदाराला पाठीशी घातले. आता सामाजिक भवनाचे काम सुरू आहे. त्यासाठी लागणारे लोखंड व इतर मटेरिअल हे पण हलक्या दर्जाचे वापरत आहे. संबंधित ठेकेदार व सा.बां. विभाग अधिकारी यांचे हितसंबंध असल्यामुळे मनमानी करत आहे. त्यामुळे अधिकारी व ठेकेदार यांना इंस्टिमेंटप्रमाणे काम करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनाची प्रत नायब तहसीलदार यांना देण्यात आली. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रा.कैलास माने उपस्थित होते.