Nagar : दरोडयाच्या तयारीत तिघांना पकडले

संगमनेर : संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे कर्मचारी गस्त घालत असताना चारचाकी गाडी कवठे कमलेश्वर रस्त्यावर वेगाने जाताना दिसली. संशय आल्याने पाठलाग करून गाडी थांबवली असता त्यात पाच जण गावठी कट्टा घेऊन दरोडा टाकण्याच्या उद्देशाने जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. तिघे ताब्यात आले तर दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यांच्यावर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवारी (दि. 28) रात्री पोलिसांचे वाहन गस्त घालत होते. पहाटेच्या वेळी पोलिसांचे वाहन निळवंडेहून वडगावपानकडे जात असताना चालक पोलीस हवालदार एस. सी. जायभाये यांना कवठे कमळेश्वर रस्त्याने इंडिका कार (एमएच २३ ई ६८४७) वेगाने जात असल्याचे दिसले. त्यांना संशय आल्याने त्या कारचा पाठलाग केला.
गाडीला थांबवून चौकशी केली असता वाहनाची झडती घेतली असता त्यात एक देशी बनावटीचे गावठी पिस्तुल, चार जिवंत काडतूस, कोयता, मिरची पूड, चार मोबाईल मिळून आले. अधिक चौकशी केली असता हमरस्त्यावर येणाऱ्या- जाणाऱ्या गाडया या चालकांनी बाजूला लावल्यानंतर त्यातून डिझेल चोरी केले करत असलेबाबतची कबुली दिली आहे.
ललित अनिल थोरात (वय 24 रा.थोरात वस्ती, वडगावपान ता. संगमनेर), किरण संजय काळे (वय 19 रा. माळेगाव हवेली ता. संगमनेर) आणि गणेश चंद्रभान गायकवाड (वय 26, रा.खांडगाव ता. संगमनेर) या तिघांना ताब्यात घेण्यात आले. इतर दोन साथीदार तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलीस हवालदार जायभाय यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.





