अहिल्यानगर : गेल्यावर्षी सरासरीपेक्षाही जास्त पाऊस झाल्याने यंदा जिल्ह्याला पाणीटंचाई कमी प्रमाणात भासणार असल्याचे भाकीत करणारी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा तोंडावर पडली असून मार्च महिन्यात झालेल्या भूजल सर्वेक्षणात अहिल्यानगर जिल्ह्याची भूजल पातळी तब्बल 1.87 मीटरने घटली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाचे टेन्शन आता वाढले असून मे महिन्यात जिल्ह्याला तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार असल्याचे चित्र आहे. आजच्या तारखेला जिल्ह्यात 60 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्यात आता मोठी वाढ दिवसेंदिवस होत आहे. जिल्ह्यात गेल्यावर्षी सरासरीपेक्षाही 177.1 मिलीमीटर पाऊस झाला.जिल्ह्यात सरासरी 448.6 मिलीमीटर पावसाची नोंद होते. मात्र गेल्यावर्षी 625.7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. एवढा पाऊस होऊन देखील मार्च महिन्यात भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्याची भूजल पातळी घटल्याचे म्हटले आहे. सप्टेंबर 2024 मध्ये झालेल्या सर्वेंक्षणात भूजल वाढलीमध्ये मोठी वाढ झाली होती. मात्र मार्च महिन्यात त्यात मोठी घट झाली. जिल्ह्यात अग्नीजन्य खडक असल्याने पावसाचे पाणी झिरपत नाही. तसेच खडकला भेगा नाही. त्यामुळे पाणी साठवून ठेवण्याची क्षमता असलेला खडक जिल्हा कमी प्रमाणात आहे. त्यामुळे मोठा पाऊस होऊन देखील पाणी साठवले जात नाही. त्याचा परिणाम भूजल पातळी कमी होण्यावर होत आहे. जिल्ह्यात 14 तालुक्यातील 202 निरीक्षण विहिरी असून या विहिरीच्या माध्यमातून भूजल पातळीचे सर्वेक्षण करण्यात येते. ही भूजल पातळीची मागील पाच वर्षाच्या मार्च महिन्यामधील सरासरी तुलनात्मक स्थिती विचारात घेऊन यंदाच्या मार्च 2025 ची भूजल पातळी निश्चित करण्यात येते. त्यामुळे भूजल पातळीमध्ये मोठी घट झाली आहे. मार्च महिन्यात पातळी खालावल्याने एप्रिल महिन्यामध्ये पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली आहे. त्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने धरणातील पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. तलाव, विहिरी याच्या पाण्याच्या पातळीत घट होतांना दिसत आहे. त्यामुळे पाणीटंचाई आता मोठ्या प्रमाणावर भासू लागली असून आजच्या तारखेला 60 टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असून यात येत्या काही दिवसात आणख वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मे महिन्यात जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता मोठ्या प्रमाणावर भासणार असल्याचे चित्र आहे. सप्टेंबरमध्ये पातळीत वाढ सप्टेंबर 2024 मध्ये झालेल्या सर्वेक्षणानुसार भूजल पातळीमध्ये वाढ झाली होती. तालुकानिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. (आकडे मीटरमध्ये) नगर- 0.89, पारनेर- 1.22, पाथर्डी- 0.53, शेवगाव- 0.98, श्रीरामपूर- 0.48, राहुरी- 0.76, नेवासा- 0.43, कर्जत- 0.91, जामखेड- 1.40, श्रीगोंदा- 0.77, संगमनेर- 0.48, अकोले- 0.24, कोपरगाव- 1.34, राहाता- 0,21. मार्चमध्ये पातळीत कमालीची घट सहा महिन्यानंतर मार्च 2025 मध्ये केलेल्या सर्वेक्षणात भूजल पातळीत मोठी घट झाली आहे. तालुकानिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. (आकडे मीटरमध्ये) नगर- 2.49 पारनेर- 1.91, पाथर्डी- 1.17, शेवगाव- 2.23, श्रीरामपूर- 1.91, राहुरी- 1.45, नेवासा- 2.14, कर्जत- 2.03, जामखेड- 2.20, श्रीगोंदा- 1.61, संगमनेर- 2.30, अकोले- 1.14, कोपरगाव- 1.95, राहाता- 1.78. नगर, संगमनेर, शेवगाव, जामखेड तालुक्यात मोठी घट जिल्ह्यात अहिल्यानगर, संगमनेर, शेवगाव, जामखेड व कर्जत या पाच तालुक्यात भूजल पातळीमध्ये मोठी घट झाली आहे. मात्र यंदाच्या मार्च महिन्यात झालेल्या सर्वेक्षणामध्ये कोपरगाव तालुक्यात 9.62 मीटरने पाणी पातळी घटल्याचे समोर आले आहे. परंतू सरासरीने 1.95 मीटरची घट आहे.