नगर: दुचाकीला टेम्पोची पाठीमागून जोराची धडक; अपघातात पती-पत्नी ठार

श्रीगोंदा – दुचाकीला टेम्पोने पाठीमागून जोराची धडक दिल्याने जखमी झालेल्या पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना आज(दि.21) सकाळी दहा वाजेच्या सुमारास तालुक्यातील कोळगाव शिवारातील कण्हेरमळा येथे नगर-दौंड महामार्गावर घडली. संभाजी मानसिंग मोहिते आणि प्रियंका संभाजी मोहिते (दोघे रा.दौंड) अशी मयतांची नावे आहेत.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, रविवारी(दि.21) सकाळी दौंडहून नगरकडे जाणार्या प्रियंका मोहिते आणि संभाजी मोहिते या पती-पत्नीची दुचाकी(एम.एच.15 पी.क्यू. 7978) तालुक्यातील कोळगाव शिवारातील कण्हेरमळा येथे दुचाकी पंक्चर झाली. त्यामुळे ते पती-पत्नी पाठीमागून आलेल्या सोमनाथ पानसरे यांच्यावर दुचाकीवर बसले तर स्वतःची पंक्चर झालेली दुचाकी पानसरे यांच्या एका मित्राने घेतली.
काही अंतर जाताच दौंडकडून भरधाव वेगाने आलेल्या एका टेम्पोने सोमनाथ पानसरे यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात संभाजी मानसिंग मोहिते यांचा जागीच मृत्यू झाला. तर प्रियंका मोहिते या गंभीर जखमी झाल्याने त्यांना नगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. सोमनाथ पानसरे हे शेतात फेकले गेल्याने किरकोळ जखमी झाले. या घटनेनंतर टेम्पोचालक टेम्पो जागेवरच सोडून पळून गेला. दरम्यान, या अपघात प्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.





