अकोले : आयुष्यामध्ये मोठी स्वप्ने पाहून स्वप्नांच्या पूर्ततेचा ध्यास अंगी बाळगावा. मोबाईलच्या वापरापासून दूर राहत आपले ध्येय गाठण्यासाठी संघर्ष करण्याचे आवाहन करत शिक्षकांनीही गुणवत्ता वाढीसाठी सातत्याने प्रयत्नशिल राहण्याचे आवाहन डॉ. किरण लहामटे यांनी केले. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, राजूर येथे शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी तसेच शिक्षकांचा गुणगौरव सोहळा आमदार लहामटे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला.यावेळी आ.लहामटे बोलत होते. याप्रसंगी सहायक प्रकल्प अधिकारी मनोज पैठणकर, कार्यालयीन अधीक्षक श्याम कांबळे, सुनिल मोरे, मुख्याध्यापिका संगीता कुलथे, नामदेव पिचड उपस्थित होते. यावेळी राजूर प्रकल्पांतर्गत असलेल्या २१ शासकीय व १७ अनुदानित आश्रमशाळांमधून गुणानुक्रमे प्रथम आलेल्या इयत्ता १० वीतील प्रत्येकी ३ विद्यार्थी, विद्यार्थीनी, इयत्ता १२ वी विज्ञान व कला शाखेतील प्रत्येकी ३ विद्यार्थी, विद्यार्थीनी अशा एकूण १८ विद्यार्थी, विद्यार्थीनींचा रोख बक्षिस, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन डॉ. लहामटे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला.याप्रसंगी प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे यांनी गुणवत्ता वाढीसाठी प्रकल्पामार्फत सातत्याने प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगितले.मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) दीपक कालेकर यांनी केले तर आभार शिक्षण विस्तार अधिकारी अंबादास बागुल यांनी मानले.