मिरी : पाथर्डी तालुक्यात कापूस ३० हजार हेक्टर, तूर १७ हजार हेक्टर, बाजरी १२ हजार हेक्टर, उडीद १० हजार हेक्टर व इतर पिके ११ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी होण्याचा अंदाज आहे. त्याप्रमाणे मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्धतेसाठी कृषी विभागाने नियोजन केले असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी महादेव लोंढे यांनी दिली. बियाणे व खते खरेदी करताना शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी बाळगावी. बियाणे व खते अधिकृत परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करावीत, बियाणे व खते खरेदी करताना विक्रेत्यांकडून पक्की पावती घ्यावी, पावतीवर बियाण्याचा व खताचा प्रकार, किंमत, लॉट नंबर, खरेदीची तारीख, विक्रेत्याची सही असल्याची खात्री करावी, बियाण्याच्या पाकिटावर उत्पादनाची तारीख आणि उगवण क्षमता तपासा. शक्य असल्यास राष्ट्रीय किंवा राज्य स्तरावर प्रमाणित केलेले बियाणे खरेदी करा. या बियाण्यांची उगवण क्षमता चांगली असते. खताचे पॅकिंग व्यवस्थित सील केलेले आहे का? त्यात भेसळ नाही? याची खात्री करुन करा. आपल्या शेतातील माती परीक्षण अहवालानुसार आवश्यक पोषक तत्वे असलेली खतेच खरेदी करावीत. अनावश्यक खतांचा वापर टाळावा. खताच्या पाकिटावरील वापराच्या सूचना, प्रमाण आणि घ्यावयाची काळजी याबद्दल माहिती वाचा आणि त्याचे पालन करण्याचे आवाहन कृषी अधिकारी लोंढे यांनी केले आहे. शेतकऱ्यांची बियाणे, खते खरेदी करताना फसवणूक होऊ नये, यासाठी नियंत्रण ठेवण्यासाठी कृषी विभागाकडून जिल्हा व तालुका पातळीवर भरारी पथक स्थापन करण्यात आले आहे. पथकाकडून कृषी सेवा केंद्राची तपासणी केली जात असून, बियाणे, खते, उपलब्ध साठा, विक्री यावर बारकाईने निरीक्षण केले जात आहे. -महादेव लोंढे, तालुका कृषी अधिकारी पाथर्डी