प्रभात वृत्तसेवा पुणे – राज्य निवडणूक आयोग यांच्या आदेशानुसार लोकशाहीचा पवित्र उत्सव साजरा करताना मतदान अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्ये जबाबदारीने बजाविण्याबाबत सूचना दिल्या आहेत. मतदारांनी नगरपरिषदेच्या निवडणुकीकरिता उर्त्स्फूतपणे मतदान करावे, नागरिक व राजकीय पक्षांनी आदर्श आचारसहिंतेचे पालन करून शांततेत पूर्ण प्रक्रिया पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांच्या २९ नोव्हेंबर २०२५ रोजीच्या आदेशानुसार नगरपरिषद, नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ चा सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला असून, त्यानुसार शनिवार, २० डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार आहे. यामध्ये बारामती आणि फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषदेकरिता पूर्ण निवडणूक तर लोणावळा, तळेगाव दाभाडे व दौंड या नगरपरिषदेच्या काही प्रभागांचा समावेश आहे. मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत आहे.शासनाने २० डिसेंबर २०२५ रोजी मतदान असलेल्या भागात सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. मतदार संघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या मतदार संघाच्या बाहेर असतील त्यांनासुद्धा लागू राहील. नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रातील केंद्र शासनाच्या शासकीय, निम्न शासकीय कार्यालय, सार्वजनिक उपक्रम बँका आदींना ही सार्वजनिक सुटी लागू राहील, असे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.