नगर – करोना कालावधीत नगर जिल्हा नियोजन आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन तसेच आरोग्य यंत्रणेकडून तब्बल 28 कोटी रुपयांचा खर्च केल्याचे दाखविण्यात येत आहे. तथापि, खर्चाची ही आकडेवारी संशयास्पद आहे. त्यामुळे खर्चाचा तपशिल तपासण्यासाठी नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयाकडे तक्रार करणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेमधील भाजपचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी दिली.
करोनाच्या कहरात जनतेचे आरोग्य अबाधित रहावे आणि करोना प्रतिबंधात्मक उपायांसाठी जिल्हा नियोजन, आरोग्य यंत्रणा आणि आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाकडून अनुक्रमे 21 कोटी 23 लाख 44,218, 4 कोटी 50 लाख आणि 2 कोटी 36 हजारांचा खर्च झाल्याचे दाखविण्यात आले आहे. प्रत्यक्षात दाखविलेला खर्च आणि झालेल्या उपाययोजना यात तफावत असण्याचीच शक्यता आहे.
रॅपिड अॅटिजन टेस्ट किट 2 कोटी 52 लाख, अॅटिजन टेस्ट किट 2 कोटी 43 लाख 60 हजार, आरटीपीसीआर स्वॅब तपासणी साहित्य खरेदी 5 कोटी 29 लाख, शासकीय कोव्हिड सेंटर अनुदान 1 कोटी 70 लाख, ऑक्सिजन पुन:भरण 1 कोटी 24 लाख याप्रमाणे करोना संबंधित प्रतिबंधात्मक उपायांसाठी जिल्हा नियोजनकडून 24 कोटी 48 लाख 88 हजार 779 रुपयांना प्रशासकीय मंजुरी मिळाली.
त्यापैकी 21 कोटी 23 लाख 44 हजार 248 रुपये रक्कम वितरीत केल्याची लेखी माहिती मिळाली. उर्वरित रक्कमही नंतरच्या कालावधीत खर्च करण्यात आली असेल. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडूनही राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून करोना प्रतिबंधात्मक उपायांसाठी तालुकानिहाय 2 कोटी 36 हजार रुपये वितरीत झाले होते.
त्यात नगर 28 लाख 32 हजार, नेवासा 4 लाख 77 हजार, शेवगाव 18 लाख 36 हजार, पाथर्डी 15 लाख, कर्जत 10 लाख 10 हजार, जामखेड 5 लाख, श्रीगोंदा 7 लाख, पारनेर 15 लाख 51 हजार, राहुरी 5 लाख, श्रीरामपूर 10 लाख 52 हजार, राहाता 13 लाख, कोपरगाव 30 लाख 8 हजार, संगमनेर 13 लाख 70 हजार, अकोले 24 लाख असा खर्च झाला. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य यंत्रणेकडूनही 4 कोटी 50 लाख खर्च झाले. त्यामानाने मिळालेल्या सुविधा संशयास्पद वाटत असल्याची तक्रार वाकचौरे यांनी केली आहे.
कोट…
नगर जिल्ह्यात करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा खर्च कोट्यवधी रुपयांचा आहे. जिल्हा नियोजन, आपत्ती व्यवस्थापन आणि आरोग्य यंत्रणेने केलेला बराच खर्च हा निव्वळ कागदावर असून, बिलेही अदा झालेली आहेत. राज्य सरकारने याबाबत झालेल्या खर्चाचे कठोर आणि काटेकोर लेखापरिक्षण केल्यास त्यातून मोठा घोटाळा समोर येण्याचीच दाट शक्यता आहे.
जालिंदर वाकचौरे.
गटनेता, भाजप, जिल्हा परिषद