Nagar : यावर्षी भरपूर पाऊस !

राहाता : यावर्षी पाऊस भरपूर होईल पण रोहिणी नक्षत्राचा पाऊस तुरळक ठिकाणी होईल, मृग व आद्रा नक्षत्रचा पाऊस चांगला होईल, खरिपाची पेर हंगाम होईल व पेरी दोन होतील, असे भाकीत (भविष्यवाणी) राहाता येथील वीरभद्र यात्रेत वीरभद्र देवस्थान च पुजारी सोमनाथ भगत यांनी केले.
राहात्यातील वीरभद्र व नवनाथ महाराजांच्या यात्रेत देवस्थानचे पुजारी सोमनाथ भगत हे प्रत्येक वर्षी पाऊस व येणारे पिके कसे असतील, याची भाकीत करतात.
प्रत्येक येणाऱ्या वर्षाची भविष्यवाणी ऐकण्याकरिता पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता असते. देवस्थानचे पुजारी भगत यांच्या भविष्यवाणीवर शेतकरी बांधव यावर्षीचे आपले आर्थिक गणिते कसे असेल, याचा अंदाज लावतात. यावर्षी वीरभद्र मंदिरासमोर स्त्री व पुरुष यांची नवसपूर्ती करण्यासाठी गळवंतीला गळी लागण्याकरिता १५०० पेक्षा जास्त उपस्थिती असल्याने व्हईक म्हणजेच भाकित सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता झाले.
यापूर्वी हे भाकीत पहाटे सहा वाजेदरम्यान व्हायचे परंतु दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात नवसपूर्ती कार्यालयांची संख्या वाढू लागल्याने भविष्यवाणी कार्यक्रमाला उशीर होऊ लागला असला तरी हे ऐकण्यासाठी अनेक नागरिकांनी रात्रीपासूनच या ठिकाणी उपस्थित होते. पुजारी सोमनाथ भगत यांनी सांगितले की, यावर्षी भरपूर पाऊस होईल पण रोहिणी नक्षत्रात काही ठिकाणी पाऊस पडेल तर मृग व आद्रा नक्षत्रात चांगला पाऊस होईल. खरिपाची पेर हंगाम होईल पण दोन होतील.
भविष्यवाणी करण्याअगोदर पाच मातीच्या कच्च्या घागरी एक सरळ रेषेमध्ये ठेवून त्यावर देवाची घोंगडी अंतरली जात. या घागरी पाण्याने भरून ठेवण्याचा मान सदाफळ परिवाराकडे आहे. पाण्याने भरलेल्या घागरीवरून मंदिराचे पुजारी तीन वेळेस चालतात. घागरीसमोर पाच नागिणीच्या पानावर विडे ठेवलेले जाता. त्या पानांच्या विड्यांना नाव राजा, प्रजा, सुख,दुःख व दारिद्र्य असे दिले जाते.
या घागरी जमिनीवर रिचल्यानंतर जो विडा जागेवर राहील त्याचा मानवतेला त्रास होतो व ज्या देशाने पाणी जास्त वाहिले त्या दिशेला पाऊस जास्त होतो, अशी भविष्यवाणीची परंपरा शेकडो वर्षापासून राहाता यात्रेत सुरू आहे. यावर्षी घागरी रचल्यानंतर पाचही पानांचे विडे पाण्याने वाहून गेले. नवसाला पावणारे ख्याती असलेल्या वीरभद्र महाराज यांच्या यात्रेतील केलेल्या भविष्यवाणीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेक वर्षापासून भगत परिवाराकडे भविष्यवाणी सांगण्याची पिढी जात परंपरा आहे.





