नगर, (प्रतिनिधी) -नगर-मनमाड रोडवरील साई मिडास या इमारतीतील वरच्या मजल्यावरील एका फायनान्स कंपनीच्या कार्यालयाला सकाळी साडेनऊच्या दरञन आग लागली. महापालिकेच्या अग्निशमन बंबाने काही क्षणात ही आग आटोक्यात आनली. नगर-मनमाड महामार्गावरील साई मिडास (डौले हॉस्पिटल चौक) या इमारतीमध्ये बँका, पतसंस्था, सोन्या-चांदीचे दुकाने, दवाखाना तसेच फायनान्स कंपनीची कार्यालये आहेत. या इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर एका फायनान्स कंपनीचे कार्यालय आहे. या कार्यालयाच्या शेजारीच एक डोळ्यांचा दवाखाना ही आहे. या कार्यालयाच्या बाहेरच्या बाजूने सकाळी साडेनऊच्या सुमारास थोडी आग लागल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. मात्र काही क्षणातच ही आग भडकली आणि आगीसोबत मोठ्या प्रमाणावर धूराचे लोळ बाहेर पडू लागले. ही बाब स्थानिकांनी महापालिकेच्या अग्निशमन विभागाला कळवली. अग्निशमन विभागाने तत्काळ दोन बंब दाखल झाले आणि पाण्याच्या फवाऱ्याने ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. मात्र इमारतीवरील काही फर्निचरचे मोठे नुकसान झाले आहे. आगीच्या घटनांना मनपा जबाबदार: आ. संग्राम जगताप शहरातील इमारतींचे दरवर्षी फायर ऑडीट झाले पाहिजे. परंतु, महापालिका अधिकार्यांच्या चुकीमुळे इमारतीचे फायर ऑडीट होत नाही. त्यामुळे आगीच्या घटना शहरात वारंवार घडत आहेत. शहरातील वाढत्या घटनांना महापालिकेचा अधिकारी वर्ग जबाबदार असून, शहरातील अग्निशमन यंत्रणा कमी पडत आहे. महापालिकेच्या अधिकार्यांच्या आर्थिक तडजोडीमुळे इमारतींचे फायर ऑडीट होत नाही. तसेच शहर व उपनगरात पत्र्यांच्या गाळ्यांचा विषय ऐरणीवर आहे. पत्र्याच्या गाळ्याला आग लागल्यास मोठे नुकसान होते. यावर अधिकार्यांचा अंकुश राहिलेला नाही. येणार्या अधिवेशनात निष्क्रिय अधिकार्यांवर कारवाईसाठी तसेच निष्क्रिय अधिकार्यांना नगरला पाठवू नये, एकाच ठिकाणी जास्त काळ राहिलेल्या अधिकार्यांच्या बदल्या कराव्यात, अशी मागणी करणार असल्याचे आमदार संग्राम जगताप म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, अजिंक्य बोरकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. स्वस्तिक नेत्रालय अँड मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये कुठलीही आगीची घटना नाही : डॉ. चौधरी सावेडी परिसरातील साई मिडास या व्यवसायिक संकुलातील वरच्या मजल्यावर आग लागली आहे. मात्र या ठिकाणी असणाऱ्या स्वस्तिक नेत्रालय अँड मॅटरनिटी हॉस्पिटलला आग लागल्याची चुकीची अफवा पसरली असून सदरची आग ही वरच्या मजल्यावर लागली होती. त्याचा धूर सर्वत्र पसरला होता. स्वस्तिक नेत्रालय अँड मॅटर्निटी हॉस्पिटलने महापालिकेच्या अग्निशमन दलाचे तसेच इतर सर्व सेफ्टीबाबत उपाययोजना पूर्वीपासूनच केल्या आहेत. अशी माहिती हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर प्रफुल्ल चौधरी यांनी दिली आहे. तर वरच्या मजल्यावर लागलेल्या आगीचा धूर खाली हॉस्पिटलमध्ये आला होता परंतु स्वस्तिक रुग्णालयात कुठल्याही प्रकारची हानी झालेली नसल्याचे त्यांनी सांगितले.