Nagar : जिजाऊ रथयात्रेचे अहिल्यानगरमध्ये उत्साहात स्वागत

अहिल्यानगर : मराठा सेवा संघ संचलित जिजाऊ रथयात्रा अहिल्यानगर शहरात दाखल होताच मोठ्या उत्साहत स्वागत करण्यात आले. जय जिजाऊ, जय शिवरायांच्या घोषणांनी शहर दुमदुमुन गेले. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर म्हणाले की, सामाजिक एकता आणि एकात्मता यासाठी जिजाऊ रथयात्रा काढली असून, बहुजन समाज जोडण्याचे काम या माध्यमातून करण्याचा मानस आहे. राज्यातील सामाजिक वीण पुन्हा मजबूत करण्यासाठी कुटुंबसंस्था, संस्कार आणि परपंराचा सन्मान करून मराठ्यांच्या उज्वल परंपरेचे स्मरण करून सामाजिक बांधिलकी दृढ करण्याचा आमचा उद्देश असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
राजेश परकाळे म्हणाले की, आज जगातील ज्या देशात धार्मिक, जातीय व वर्णभेद निर्माण झाले, ते देश रसातळाला गेले आहे. तसे आपले होऊ नये, यासाठी महाराष्ट्रात जाती-जातीमध्ये सलोखा व धार्मिक एकोपा निर्माण करण्यासाठी तसेच माणसे जोडत त्यांच्यामध्ये एकता, बंधूता निर्माण करण्यासाठी या रथयात्रेचे आयोजन केले आहे.
मराठा सेवा संघाच्यावतीने मराठा जोडो अभियान सुरू करण्यात आले असून जिजाऊ रथयात्रा उपनगरातील श्रीराम चौक, भिस्तबाग नाका, प्रेमदान चौक, बालिकाश्रम राडे, चौपाटी कारंजा, चितळेरोड, कापडबाजार, माळीवाडा परिसरात महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून यात्रा केडगाव मार्ग श्रीगोंदा येथे गेली.
महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांच्यावतीने स्वागत करण्यात आले. याप्रसंगी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश इथापे, राजेंद्र निंबाळकर, अमोल लहारे, विजय नवले, अर्जुन जाधव, बापू साठे, रिजवान शेख, असिफ दुलेखान, डॉ.विजय कवळे, अॅड.विक्रम वाडेकर, निखील वारे, बाळासाहेब पवार, अॅड.रविंद्र शितोळे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे, अण्णासाहेब सावंत, बंटी भिंगारदीवे, निलेश बोरुडे, बाळसाहेब सोनाळे, अविनाश मेढे, श्रीपाद दगडे, अमोल राजेभोसले, अशोक कुटे, प्रदीप वाखुरे, माजी महापौर शीलाताई शिंदे, करुणा काळे, संपुर्णा सावंत, संचिता गुंजाळ, सविता मोरे आदींसह मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते.





