जामखेड : स्वारगेट बसस्थानकावरील बंद बसगाडीत एका व्यक्तीने महिलेवर अत्याचार केल्याची घटना समोर आल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सर्व विभागीय नियंत्रक, आगार व्यवस्थापकांना प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सक्त सूचना केल्या आहेत. पण, गेल्या तीन वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत असणाऱ्या जामखेड बसस्थानक परिसरात पुरेसा उजेड नाही. पोलिस चौकी आहे पण कर्मचारी नसतात. इमारतीचे काम साडेतीन वर्षांपासून धिम्या गतीने सुरू आहे. बसस्थानकात सध्या प्रवाशांना बसण्यास साधे बाकडेही नाहीत. थांबण्यास अपुरी जागा असल्याने महिला, विद्यार्थिनींचे हाल होत आहे. इतरही ज्येष्ठ नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याने प्रवाशी समस्यांच्या गर्तेत सापडले आहेत. शहरातील जामखेड बसस्थानकावर दररोज सुमारे २०० च्यावर गाड्या ये-जा करतात. तेथून दररोज किमान १० हजार प्रवासी विविध ठिकाणी प्रवास करतात. पण, अनेकदा बसमध्ये चढताना प्रवाशांचे दागिने लंपास झाल्याच्या घटना घडल्या आहेत.महिलांसाठीच्या स्वच्छतागृहाची अवस्था दयनीय झाली आहे. चार जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या जामखेड बसस्थानकात चोवीस तास बस ये-जा करतात. त्यामुळे दिवसभर येथे प्रवाशांचा राबता असतो. अनेक प्रवासी विशेषतः महिला या ग्रामीण भागात जाण्यास बस न मिळाल्यास बसस्थानकात झोपतात. येथे पोलिस चौकी आहे. मात्र, येथे बऱ्याचदा पोलिस कर्मचारी नसतात. त्यामुळे येथे पोलिसांची गस्त वाढवणे आवश्यक आहे. दर्जेदार सीसीटीव्ही कॅमेरे देखील बस स्थानकाच्या आवारात नाहीत. गेल्या तीन वर्सपासून जामखेड बसस्थानकांचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. फलाट नसल्याने गाड्या अस्तव्यस्त प्रकारे उभ्या असतात, त्याठिकाणी लाईटचा पुरेसा उजेड दिसून येत नाही. पोलिस चौकीत कर्मचारी नव्हता, महिलांसाठी कोणत्याही प्रकारच्या सुरक्षेतची काळजी घेतली जात नाही. पिण्याच्या पाण्याची सोय नाही ,स्वच्छतेचे तीन तेरा वाजले आहेत. एकूणच प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पुरेशी लाईटची सोय करावी, दर्जेदार सीसीटीव्ही लावावेत, स्थानकाच्या आवारात इतर कोणत्याही प्रकारच्या खासगी गाड्या उभा करू नयेत, उभा असतील तर त्याठिकाणी जाऊन सतत पाहणी करावी, अशा मागण्या प्रवाशांकडून होत आहेत. विद्यालय, महाविद्यालय सुटल्यावर मुली बसस्थानकात आल्यानंतर मोठ्या प्रमाणावर रोडरोमिओ येथे येतात. त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी विद्यार्थिनींकडून केली जात आहे. आमदार रोहित पवार यांच्या पुढाकाराने ९ जुलै २०२१ रोजी नवीन बसस्थानकाचे काम सुरू झाले. १४ महिन्यांत सदर काम पूर्ण करायचे होते. मात्र, ठेकेदारावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने काम धिम्या गतीने सुरू आहे स्वच्छतागृहांची दुरवस्था, सर्वत्र दुर्गंधी.. बसस्थानकातील स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे महिला, मुलांना अडचणींना सामोरे जावे लागते. त्यातच परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे. प्रवाशांना तोंडाला रूमाल धरून उभे राहत बसची वाट पाहावी लागते. महिलांसाठी हिरकणी कक्ष नाही. उपाहारगृह बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.