पारनेर : आजवर सासू-सुनाचा कौटुंबिक वाद पाहिला, मात्र हा वाद थेट सहकारातील महत्त्वाच्या समजल्या जाणऱ्या महानगर बँकेत होताना दिसत आहे. या लढाईत सासू की सून कोण वरचढ होईल हे निवडणुकीच्या निकालानंतर दिसून येईल. मात्र, अशा लढाईमध्ये हानी ही कौटुंबिक होत असते. ती हानी शेळके कुटुंबाची यानिमित्ताने झाली आहे. सहकाराची निवडणूक म्हटले की प्रचाराची पद्धत ही वेगळी असते. पण सध्या महानगर बँकेची होत असलेली निवडणूक ही एखाद्या राजकीय निवडणुकीला लाजवेल अशा पद्धतीने सुरू असून, स्व. संस्थापक गुलाबराव शेळके पॅनलचा प्रचार हा एखाद्या राजकीय निवडणुकीला लाजवेन अशा पद्धतीने होत आहे. पारनेर तालुक्यातून मुंबई येथे जाऊन स्व. सॉलिसिटर गुलाबराव शेळके यांनी महानगर बँकेची मुहूर्तमेढ रोवली. बँकेचे मोठे सामर्थ्य निर्माण करताना होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुका बिनविरोध होत गेल्या. तो कित्ता कै. उदय शेळके यांनीही गिरवल. त्यांच्या कारकिर्दीत विरोधक मोट बांधण्यात अपयशी ठरले मात्र दोन्हीही कर्तबगार नेत्यांच्या अकाली निधनाने बँकेसकट तालुक्यातील सहकार व इतर क्षेत्रांवरही आघात झाला. उदय शेळके यांच्या पश्चात बँकेचे अध्यक्षपद त्यांच्या मातोश्री सुमन शेळके यांच्याकडे आले. सुमन शेळके यांनीही गेल्या अडीच वर्षात बँकेचा पारदर्शक कारभार केला, मात्र हीच बाब विरोधकांना खटकली. याचा फायदा उठवत कौटुंबिक कलह निर्माण झाला. कौटुंबिक दोन पॅनल तयार होऊन महानगरची लढाई ही कौटुंबिक झाली. स्व. गुलाबराव शेळके यांच्या खांद्याला खांदा लावून महानगर वाढवण्यासाठी मेहनत घेतली, त्या सुमनताईना या वयात अशा परिस्थितीला सामोरे जावे लागणे ही बाब शेळके कुटुंबासाठी दुर्दैवी आहे. विरोधकांनी मोट बांधत त्यांचे नेतृत्व त्यांच्या सून गीतांजली शेळके करत आहेत. खरंतर कुटुंबात समझोता होऊन गीतांजली शेळके यांनी दोन पावले मागे येणे गरजेचे होते, मात्र तसे झाले नाही. शेळके विरोधात शेळके अशी लढाई या निमित्ताने तालुक्याला पहावयास मिळत आहे. सासू-सुनांची लढत व सुनेचा सासूच्या वर्चस्वला धक्का देत वेगळे अस्तित्व निर्माण करण्यासाठी निवडणुकीच्या माध्यमातून सुरू असलेला प्रयत्न हा सभासदांसह तालुक्यातील जनतेला पहावा लागत आहे. बँकेच्या विद्यमान अध्यक्षा सुमन शेळके यांना पती व मुलाच्या अकाली निधनाने झालेले दुःख व त्यातून सावरत त्यांनी केलेला बँकेचा कारभार आदर्शवत राहिला. असे असताना शेळके कुटुंबातीलच त्यांच्या सून गीतांजली शेळके यांनी विरोधात जात स्वतंत्र पॅनल करत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने सुमन शेळके यांची अवस्था काय असेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अस्तित्वाची लढाई! स्व. गुलाबराव शेळके, स्व. उदय शेळके यांच्या पश्चात बँकेचे अध्यक्षपद सांभाळणाऱ्या विद्यमान अध्यक्षा सुमन शेळके यांच्या विरोधात त्यांच्या सून विद्यमान संचालक गीतांजली शेळके यांनी मोट बांधली आहे. मात्र, हे होत असताना गीतांजली शेळके यांनी शेळके परिवाराची असणारी निवडणूक बिनविरोधची परंपरा राखणे गरजेचे होते पण स्वतःच्या अस्तित्वासाठी शेळके परिवार लढत असल्याचे दिसून येत आहे. मतदाराची सहानुभूती कोणाला? गीतांजली शेळके यांना भविष्यात संधी असताना सुमन शेळके यांच्यानंतर त्यांच्याकडेच नेतृत्व आले असते परंतु तसे न होता सुमन शेळके यांच्या नेतृत्वाला दिलेले आव्हान मतदारांना भावेल की त्याची सहानुभूती विद्यमान अध्यक्षा सुमन शेळके यांना मिळेल हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईल. राजकीय पुढार्यांचा हस्तक्षेप! गीतांजली शेळके यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत असले तरी त्यांनी प्रत्येक ठिकाणी सभा व राजकीय क्षेत्रातील पुढार्यांना घेऊन घेतलेल्या सभा व त्या पद्धतीने होत असलेला प्रचार तर दुसरीकडे साध्या पद्धतीने कुठलाही लवाजमा न जमावता होत असलेला प्रचार यापैकी कोणता प्रचार मतदारांना भावना हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईल.