Nagar : देशमुख कुटुंबीयांच्या पाठीमागे भगवानगड; जातीय रंग न लावता न्यायासाठी प्रार्थना करा : महंत शास्त्री

पाथर्डी : स्व.संतोष देशमुख यांच्या आरोपींना आम्ही पाठीशी घालत नसून, भगवानगड हा स्व.संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयामागे आहे. गड हा आरोपींच्या मागे नाही, असे स्पष्ट करून भगवानगडाचे महंत डॉ.नामदेव शास्त्री यांनी देशमुख कुटुंबीयांना आश्वासित करून याला जातीय रंग न देता न्यायासाठी सर्व जन प्रार्थना करू, असे आवाहन केले. रविवारी दुपारी देशमुख कुटुंब भगवानगडावर येऊन त्यांनी संत भगवानबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर महंत डॉ.नामदेव शास्त्री यांची भेट घेतली. यादरम्यान स्व.संतोष देशमुख यांना भगवानगडाच्यावतीने गडावर श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. महंत नामदेव शास्त्री महाराज व देशमुख कुटुंबीयांची अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली.
महंत शास्त्री यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचे समर्थन करून आरोपींची मानसिकता अशी का झाली, हे तपासण्याची गरज आहे, असे वक्तव्य केल्यानंतर रविवारी स्व. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयातील त्यांचे बंधू धनंजय देशमुख, मुलगी वैभवी देशमुख, मुलगा व इतर नातेवाईक यांनी गडाचे महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली. आरोपींविरुद्ध असलेले अनेक गुन्हे व सरपंच संतोष देशमुख यांचे असलेले चांगले काम याचे कागदपत्रे महंतांना दिली. त्यानंतर शास्त्री बोलत होते.
शास्त्री म्हणाले की, देशमुख यांचे कुटुंबीय हे भगवानगडाला मानणारे असून नेहमी ते भगवानगडावर भगवान बाबांच्या दर्शनासाठी येतात. ते गडाला मानणारे असून भगवानगडाचे शिष्य आहेत. त्यामुळे देशमुख कुटुंबीयामागे भगवानगड सदैव आहे. आरोपींची खरी पार्श्वभूमी काय आहे. त्यासाठी देशमुख कुटुंबीयांनी आरोपींविरोधात असलेले अनेक गुन्ह्यांचे कागदपत्रे दाखवले आहे. स्व.संतोष देशमुख यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केलेले कामे हे किती चांगली आहे, याचे प्रमाणपत्रे दाखवली. अनेक पुरस्कार गावाला मिळाले आहेत. देशमुख कुटुंबीय हे भगवान बाबांना मानणारे आहे.आज मला ते कळाले असून, देशमुख कुटुंबीयांची जमीन तीन पिढ्यांपासून वंजारी समाजाचे मुंडे कुटुंबीय करीत आहे. त्यामुळे जातीवाद न करता खऱ्या आरोपींना शिक्षा व्हावी, असे माझे भगवान बाबांच्या गादीवरून सर्वांना सांगणे आहे.जातीवाद न करता सामाजिक सलोखा कायम राहण्यासाठी देशमुख कुटुंबीय भगवानगडावर आल्याचेही शास्त्री म्हणाले.
धनंजय देशमुख म्हणाले, स्व. संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्व समाजातील लोक मदत करत आहे. परंतु ज्याला आरोपीची बाजू घ्यायची आहे, तेच लोक जातीवाद करत आहे. या प्रकरणात कोणी जातीवादपणा करत असेल तर त्याला आपण समज देण्याचे काम करावे. बीड जिल्ह्यासह राज्यातील लोकप्रतिनिधी, पोलीस यंत्रणा पहिल्या दिवसापासून न्याय मिळवून देण्याच्या भूमिकेत देशमुख कुटुंबीयांबरोबर आहे. त्यांना जातीवादी म्हणण्यात आले. अशा गोष्टीमुळे या न्यायाच्या लढ्यामध्ये देशमुख कुटुंबीयांबरोबर सहभागी होणारे येतील का नाही? असा प्रश्न या परिस्थितीत निर्माण झाला आहे. त्यामुळे हे गांभीर्य पाहण्याची गरज आहे.
वैभवी देशमुख म्हणाली, गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांमुळे माझ्या वडिलांची हत्या झाली आहे. ही वृत्ती समाजातून बाहेर काढायची आहे. या आरोपींबाबत कोणाला समर्थन करायचे असेल तर त्याच्यावर आम्हाला काही बोलायचं नसून त्याआडून आरोपीची पाठराखण करणारे जातिवाद काढत आहे. देशमुख कुटुंबीयांनी कधी जातिवाद केला नसून आता न्याय मिळवण्यासाठी जातिवादाचे वेगवेगळे फाटे फुटत आहे.
मी काहीही बोललेलो नाही, मी तुमच्या पाठीमागे आहे. संतोष देशमुख यांच्याबाबत केलेला प्रकार हा समाजातील वाईट लोकांचा आहे. तुम्ही भगवानगडाचे शिष्य असून तुमच्या बाजूने मी आहे. कदाचित माझ्या बोलण्याचा गैरसमज झाला असेल. मी गुन्हेगाराचे समर्थन करणारा नाही. इतर लोकांनी माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढला.
– महंत नामदेव शास्त्री





